विनोदाच्या धबधब्यात गडहिंग्लजकर चिंब
By admin | Published: April 12, 2017 12:29 AM2017-04-12T00:29:59+5:302017-04-12T00:29:59+5:30
पु. लं.चा जीवनपट विविध प्रसंगांतून उलगडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून झाला
गडहिंग्लज : महाराष्ट्र भूषण पु. ल. देशपांडे यांच्या साहित्य व आधारित गीत, नाट्य, चित्रपट, एकपात्री प्रयोग, अभिवाचन आणि विनोद आदींच्या ‘पुलांगण’ या संगीतमय कार्यक्रमाने येथील रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकले. किंबहुना, स्वरांच्या बरसातीत आणि विनोदाच्या धबधब्यात गडहिंग्लजकर चिंब झाले.संत गजानन महाराज शिक्षण समूह व केदारी रेडेकर फौंडेशन यांच्या सहकार्याने येथील रसिका तुझ्याचसाठी या संस्थेतर्फे आयोजित हा कार्यक्रम पालिकेच्या शाहू सभागृहात पार पडला. कोल्हापूरच्या कलांजली विद्यार्थी संघ व षडज्गंधार यांनी हा कार्यक्रम सादर केला.‘इंद्रायणी काठी’, ‘नाच रे मोरा’, ‘कौसल्येचा राम बाई’, ‘पाऊस भिजतो’, ‘माझ्या कोंबड्याची शान’, ‘येथेच टाका तंबू’ या गीतांना श्रोत्यांची विशेष दाद मिळाली. सौजन्य सप्ताह, व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ, उपवास, आदींच्या अभिवाचनाने मैफिलीत रंगत आणली. वैदेही जोशी यांनी बहारदार निवेदन केले.
पु. लं.चा जीवनपट विविध प्रसंगांतून उलगडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून झाला. यात राधिका ठाणेकर, सुनील जोशी, निखिल जोशी, सुधीर जोशी, रोहित जोशी, पराग ठाणेकर, रविराज पवार, मिताली जोशी, प्रियांका मोघे यांनी भाग घेतला. त्यांना विजय पाटकर यांनी हार्मोनिअम साथ, तर संदेश खेडेकर यांनी तबला साथ दिली. ध्वनी संयोजन शेखर गुळवणी यांचे होते. यावेळी नगरसेविका श्रद्धा शिंत्रे, डॉ. अनंत मुजुमदार, पी. डी. देशपांडे, रवींद्रनाथ जोशी, अनुजा बेळगुद्री, अरुण कोटगी-बेनाडीकर, आदींसह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी गाणसरस्वती किशोरी आमोणकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रा. श्रीकांत नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.