गगनबावड्यात पुन्हा ‘सतेज-पी. जी.’ यांच्यात निकराची झुंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:29 AM2021-09-08T04:29:45+5:302021-09-08T04:29:45+5:30
(जिल्हा बँक लाेगोसह सतेज पाटील व पी. जी. शिंदे यांचे फोटो वापरावेत) राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : ...
(जिल्हा बँक लाेगोसह सतेज पाटील व पी. जी. शिंदे यांचे फोटो वापरावेत)
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वांत कमी मतदान असलेल्या गगनबावडा तालुक्यात नेहमीच संघर्षपूर्ण लढत झाली आहे. या वेळेला विकास संस्था गटातून पालकमंत्री सतेज पाटील हे स्वत: रिंगणात उतरणार असल्याने पुन्हा एकदा मंत्री पाटील व पी. जी. शिंदे यांच्यात निकराची झुंज पाहावयास मिळणार आहे. मतदार यादीवर घेतल्या जाणाऱ्या हरकतीवरूनच हा संघर्ष किती टाेकाला जाणार याची प्रचिती येते.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात विकास संस्था गटातून बारा तालुक्यांतून प्रतिनिधी निवडले जातात. बहुतांशी तालुक्यात या गटात मक्तेदारी पाहावयास मिळते. मात्र अधूनमधून शिरोळ, शाहूवाडी, गगनबावडा, आजरा, पन्हाळा तालुक्यातील मतदारांनी प्रस्थापिताना अस्मानही दाखवले आहे. गगनबावडा तालुका दुर्गम असल्याने येथे सहकारी संस्थांची संख्या १४० आहेत. विकास संस्था गट वगळता इतर गटातून तालुक्याला संधी मिळत नाही. त्यामुळे विकास संस्था गटातून नेहमीच चढाओढ राहिली आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर या गटावर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे यांचे वर्चस्व राहिले आहे. बँकेच्या २००१ च्या निवडणुकीत सतेज पाटील यांना शिंदे यांचा धक्कादायक पराभव करून बँकेत एंट्री केली होती. मात्र, त्यानंतर बँकेच्या झालेल्या दोन निवडणुकीत मंत्री पाटील यांनी प्रयत्न केले, पण ठरावांचे गणीत जुळत नसल्याने त्यांनी इतरांना रिंगणात उतरवले.
बँकेच्या २०१५ च्या निवडणुकीत ६६ संस्था मतदानास पात्र राहिल्या. मात्र ही लढाई सर्वेाच्च न्यायालयापर्यंत पोहोचली. गेल्या पाच वर्षांत संस्थांत्मक कुरघोड्या मोठ्या प्रमाणात झाल्या, यातून संस्थांची नोंदणी रद्द करणे आदी प्रकार घडले. एकीकडे दोन्ही गटाने ठरावाचे गणीत जुळल्याचे सांगितले जात असले, तरी प्रारुप यादीवर दोन्ही गटांकडून जोरदार हरकती घेतल्या जात असल्याने निवडणुकीत येथील संघर्ष टोकाला पोहोचणार हे निश्चित आहे.
गगनबावड्यातील जिल्हा बँकेच्या सभासद संस्था-
विकास संस्था - ६८
खरेदी विक्री संस्था - ३
नागरी पतसंस्था - ३
पाणीपुरवठा, दूध, मजूर व इतर संस्था - ६६
पहिल्यांदा पाटील तर नंतर शिंदे विजयी
मागील २०१५ च्या निवडणुकीत ६६ मतदान झाले, मात्र त्यातील २३ मतदान स्वतंत्र घेतल्याने मतमोजणी दिवशी ४३ मते मोजली गेली. यामध्ये मानसिंग पाटील २५, तर पी. जी. शिंदे यांना १८ मते पडली होती. त्यानंतर सर्वेाच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २३ मते मोजण्यात आली आणि यामध्ये पाटील यांना ५, तर शिंदे यांना १८ मते पडली होती.
दोन -तीन मतांवरच जय-पराजय
या वेळीही काटा लढत होणार आहे, दोन-तीन मतांवरच जय-पराजय राहणार आहे. त्यादृष्टीनेच हरकती घेऊन त्या संस्था अपात्र करण्यासाठी चढाओढ सुरू आहे.
गगनबावड्यातून आतापर्यंतचे प्रतिनिधी-
१९७० ते १९८५ - उदयसिंग पाटील
१९८५ ते १९९१ - आण्णासाहेब पडवळ
१९९१ ते २००१ - पी. जी. शिंदे
२००१ ते २००५ - सतेज पाटील
२००५ ते २००९- पी. जी. शिंदे
२०१५ ते २०२१ - पी. जी. शिंदे