गगनबावड्यात शेतीचे झाले वाळवंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:24 AM2021-07-27T04:24:07+5:302021-07-27T04:24:07+5:30
पावसाने डोंगरमाथ्याच्या उतारावरील भात शेती, नाचना, वरी व ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदीकाठची ऊस, भात ...
पावसाने डोंगरमाथ्याच्या उतारावरील भात शेती, नाचना, वरी व ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदीकाठची ऊस, भात या पिकांची वाताहत झाली आहे.
गगनबावडा तालुक्यामध्ये कोदे, तळीये, वेसर्डे, निवडे, तिसंगी, वेतवडे, मांडुकली, अणदूर, शेणवडे, शेळीशी, धुंदवडे, बावेली या ठिकाणी डोंगराचे काप तुटून गेले आहेत. कोदे, तळये, वेसर्डे, निवडे, मांडुकली येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान आले आहे. तिसंगी येथील शेततळ्याचा बांध फुटल्यामुळे पाण्याचा प्रवाह गावातील नागरी वस्तीत शिरला. शेणवडे येथील गुरववाडीतील भराडीचे पाणी येथील डोंगराचा काप खाली वाहून आल्यामुळे विहीर जमीनदोस्त होऊन 5 एकर शेती गाळाने भरून गेली आहे.
अणदूर-धुंदवडे येथील रस्ता 6 ते 8 फूट खोल खचला गेला असून, शेळोसी गावालगतच्या रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. तिसंगीपैकी टेकवाडी येथील वस्तीला अद्यापही महापुराच्या पाण्याचा वेढा पडला असून, लोकांचा संपर्क तुटला आहे. आजअखेर तालुक्यात 2879 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
अंशत: 10 घरांची पडझड झाल्याचा अंदाज असून, तालुक्यातील 7 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
मांडुकली येथे भूस्खलन झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.