गगनबावडा ग्रामपंचायतीत गैरव्यवहार

By admin | Published: December 26, 2014 11:01 PM2014-12-26T23:01:34+5:302014-12-26T23:47:33+5:30

कारवाईसाठी उपोषण : पदाधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, दबाबापोटी दोषींवर थेट कारवाई नाही

Gaganbawda Gram Panchayat Practices | गगनबावडा ग्रामपंचायतीत गैरव्यवहार

गगनबावडा ग्रामपंचायतीत गैरव्यवहार

Next

भीमगोंडा देसाई-कोल्हापूर -गगनबावडा ग्रामपंचायतीमध्ये गैरव्यवहार व नियमबाह्य कामे केल्याचे वेळोवेळी केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. सन २००९ पासून तेथील कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. परंतु, दबावाला बळी पडून दोषींवर थेट कारवाई न करता अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवित आहेत. त्यामुळे नुकतेच काही ग्रामस्थांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधले. परिणामी, ग्रामपंचायतीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
ग्रामपंचायत गट नंबर ६, ३४, ३५ व मुलकीपड गट नंबर ५ मधील झाडे तत्कालीन ‘कारभाऱ्यां’नी सन २००९ मध्ये तोडण्याची प्रक्रिया राबविली. शासनाचे नियम धाब्यावर बसवून मे २०१० मध्ये कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली. संबंधित ठेकेदाराने ग्रामपंचायतीने दिलेल्या परवानगीपेक्षा ७० ते ८० टक्के जादा वृक्षतोड केली. तसेच वृक्षतोड करण्यापूर्वी लिलावाची रक्कम ९३ हजार रुपये भरून घेतलेले नाहीत. परिणामी, ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा प्रकारे बोगस लिलाव विक्री व बेकायदेशीर वृक्षतोड केली आहे.
सरकारी जागेमध्ये घराचे पक्के बांधकाम करून अतिक्रमण केल्याच्या तक्रारीवरून गगनबावडा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी चौकशी करून तो चौकशी अहवाल २१ जून २०१४ रोजी जिल्हा परिषदेकडे पाठविला आहे. ग्रामपंचायतीशी ११ महिन्यांचा भाडेपट्टीचा करार १०० रुपयांच्या साध्या मुद्रांकावर करूनही संजय वरेकर, अमर पाटील, रेश्मा हवलदार, अविनाश संकपाळ यांनी ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर ५७७ मधील जुन्या नळ पाणीपुरवठा विहिरीजवळील जागेमध्ये पक्की बांधकामाची घरे बांधली आहेत; परंतु या चौघांनी ग्रामपंचायतीसोबत केलेल्या कराराचा भंग केला आहे. भाडेपट्टीने दिलेल्या जागेवर पक्के बांधकाम करू नये, यासाठी ग्रामपंचायतीने विरोध केला नाही. सार्वजनिक शौचालयालगतच संजय वरेकर यांनी नागरिकांना येता-जाता येणार नाही, अशाप्रकारे घराचे पक्के बांधकाम करून अतिक्रमण केले आहे.
उत्पन्नातील १५ टक्के वाटा मागासवर्गीयांच्या विकासासाठी खर्च करणे शासन नियमानुसार बंधनकारक आहे. मात्र, सन २००८-०९ ते २०१२-१३ अखेर ग्रामपंचायतीने ज्या-त्या वर्षी निधी खर्च केलेला नाही. मागासवर्गीयांनाच विकासापासून वंचित ठेवले असून, बोगस, पोकळ खर्च दाखवून अपहार केला आहे. (पुर्वार्ध )

गेली काही वर्षे गगनबावडा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी यांच्याकडून मनमानी कारभार सुरू आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार केली आहे. नळ पाणीपुरवठा योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. मात्र, कारवाई करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. कारवाई त्वरित करावी, या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. यावेळी प्रशासनाकडून आठ दिवसांची मुदत दिली आहे.
- गिरीश प्रभूलकर, तक्रारदार.


तपासणीत ठेवल्या त्रुटी...
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २० नोव्हेंबर २०१४ रोजी ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन कारभाराची तपासणी केली. तपासणीत ग्रामपंचायतीने करवसुली नमुना नंबर ९ प्रमाणे सर्व खातेदारांना मागणी बिले १२९/१ लागू केलेली नाहीत. करवसुली एकूण मागणी रक्कम ६ लाख ७६ हजार ३५० आहे. मात्र, १९ टक्के इतकीच करवसुली झाली आहे. मासिक सभा इतिवृत्त २०१४ पर्यंत लिहिले आहे; पण त्यावर सरपंच, ग्रामसेवक यांच्या सह्या नाहीत. सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्याचे इतिवृत्त लिहिलेले नाही. वर्षनिहाय दप्तराचे अ, ब, क, ड मध्ये अभिलेख वर्गीकरण केलेले नाही. तसेच ग्रामपंचायतीकडील नमुना नंबर १ ते २७ मधील नवीन नमुन्यामध्ये दप्तर ठेवलेले नाही

Web Title: Gaganbawda Gram Panchayat Practices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.