गगनबावड्यात काँग्रेसच सतेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:25 AM2021-01-19T04:25:58+5:302021-01-19T04:25:58+5:30
गगनबावडा : तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत तीन ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून, पाच ठिकाणी सत्त कायम राहिली आहे. तालुक्यातील ...
गगनबावडा : तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत तीन ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून, पाच ठिकाणी सत्त कायम राहिली आहे. तालुक्यातील आठ पैकी सर्वाधिक सहा ग्रामपंचायतीत कॉंग्रेसचा झेंडा फडकला असून, एका ग्रामपंचायतीत भाजपने तर एका ग्रामपंचायतीत शिंदे गटाने सत्ता कायम राखली आहे.
तालुक्यातील सांगशी-सैतवडे, असंडोली तर मुटकेश्वर-खडुळे ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून, गगनबावडा, कातळी-लखमापूर, वेतवडे, किरवे व लोंघे येथे सत्ता कायम राहिली आहे. सांगशी-सैतवडे या ग्रामपंचायतीत काँग्रेसच्या दोन गटातच दुरंगी लढत झाली. त्यात पांडुरंग पडवळ व कृष्णा पाटील यांच्या गटाने नऊपैकी अशं जागा जिंकत सत्तापरिवर्तन केले. असंडोली या ग्रामपंचायतीत दोन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित पाच जागांसाठी काँग्रेस-शिवसेना आघाडी विरुद्ध भाजप-शिंदे गट अशी दुरंगी लढत झाली. एकूण सातपैकी पाच जागा जिंकत कॉंग्रेस-शिवसेना आघाडीने सत्तांतर केले.
मुटकेश्वर-खडुळे या ग्रामपंचायतीत सतेज पाटील व शिंदे या दोन गटातच दुरंगी लढत झाली. त्यात सर्वच्या सर्व सात जागा मिळवत पालकमंत्री सतेज पाटील गटाने सत्तांतर केले.
तालुक्यात लक्ष्यवेधी ठरलेल्या गगनबावडा ग्रामपंचायतीत सत्ताधारी दीपक घाटगे-पोतदार गटाविरुद्ध अरुण चव्हाण गट या दोन गटात दुरंगी लढत झाली. त्यामध्ये नऊ पैकी आठ जागा जिंकत सत्ताधारी दीपक घाटगे-पोतदार गटाने सत्ता कायम राखली आहे. कातळी-लखमापूर ग्रामपंचायतीत दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित सात जागांसाठी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी दुरंगी लढत झाली. एकूण नऊपैकी सहा जागा जिंकत भाजपचे पंचायत समिती सदस्य आनंदा पाटील यांनी सत्ता कायम राखली.
...............
वेतवडे येथे शिंदे यांचे वर्चस्व
जिल्हा बँकेचे संचालक पी.जी. शिंदे यांच्या वेतवडे ग्रामपंचायतीत शिंदे गट व पालकमंत्री सतेज पाटील गटाने समझोता करत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. यात पाच जागा बिनविरोध निवडून आल्या. मात्र उर्वरित दोन जागांवर एकाच महिलेने दोन जागी फॉर्म भरल्याने बिनविरोधला खो बसला. या दोन्ही जागेवर शिंदे व पाटील गटाचे उमेदवार निवडून आले असून, या ठिकाणी शिंदे व पाटील गटाच्या भैरवनाथ ग्रामविकास संयुक्त आघाडीने सत्ता कायम राखली आहे.
.............
सभापतींनी सत्ता राखली
गगनबावडा सभापती संगीता पाटील यांच्या किरवे ग्रामपंचायतीत काँग्रेसच्या दोन गटातच काट्याची दुरंगी लढत झाली. त्यात सातपैकी चार जागा मिळवत पाटील यांच्या गटाने सत्ता कायम राखली आहे. लोंघे या ग्रामपंचायतीत दोन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित पाच जागांसाठी लढत झाली. येथील सर्वच सात जागा मिळवत कॉंग्रेसने सत्ता कायम राखली.
फोटो ओळ –
गगनबावडा येथे विजयानंतर गुलालाची उधळण करत जल्लोष करताना कार्यकर्ते.