गगनबावडा तालुका दुर्लक्षितच

By admin | Published: December 30, 2014 09:19 PM2014-12-30T21:19:13+5:302014-12-30T23:42:20+5:30

लोकप्रतिनिधींची अनास्था : पर्यटनवाढीसाठी सुविधांची गरज

Gaganbawda taluka neglected | गगनबावडा तालुका दुर्लक्षितच

गगनबावडा तालुका दुर्लक्षितच

Next

चंद्रकांत पाटील - गगनबावडा -निसर्गसौंदर्याने बहरलेल्या, सह्याद्रीच्या कडेकपारीत वाड्यावस्तींसह विस्तारलेल्या गगनबावडा तालुक्यात विपुल जैवविविधता व बाराही महिने पर्यटकांना गारवा देणारे वातावरण, तसेच अनेक पर्यटनस्थळे आहेत. मात्र, लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे तालुका पर्यटनाबाबत अन्य तालुक्यांच्या तुलनेत मागे राहिला आहे.
गगनबावडा तालुका हा ४६ वाड्यावस्तींसह वसला असून, तालुक्यात अनेक पुरातन व ऐतिहासिक स्थळे आहेत. ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून उदयास येत असलेल्या गगनबावडा येथे रिसॉर्टसह उन्हाळ्यात रानमेव्यांची सरबराई मन खेचून घेते. विविध जातींच्या वनप्राण्यांसह करूळ व भुईबावडा घाटातील कोकण पॉर्इंट, वळणाचे रस्ते, खोल दऱ्या पाहून पर्यटक मोहून जात आहेत.
तालुक्यातील बोरबेट येथील विस्तीर्ण पठार, तेथील आकर्षक मोरजाई मंदिर, गुहा, नजीकचा कलकसांडे प्रकल्प, साखरी-तिसंगी येथील तामजाई मंदिर, तळगे बुद्रुक येथील वळताई देवीचे अधिष्ठान, मुटकेश्वर येथील मुक्तेश्वर मंदिर व तेथील पुरातन वारुळ शासनाच्या दुर्लक्षामुळे नष्ट होऊ लागले आहे. तसेच पळसंबे येथील पंत अमात्य बावडेकर सरकारांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या वाड्याची दुरवस्था झाली आहे.
तालुक्यात लखमापूर-नरवेली येथील कुंभी मध्यम प्रकल्पाबरोबरच अणदूर, कोदे, वेसरफ येथील तलाव पर्यटकांना आकर्षित करून घेत आहेत. त्यामुळे तालुक्यातील या सर्व स्थळांचा पर्यटन केंद्रात समावेश करणे गरजेचे आहे. कोकणशी थेट हृदयाचे नाते जोडणारा गगनबावडा हा केंद्रबिंदू आहे. येथे हजारो पर्यटक हजेरी लावतात. मात्र, त्यांच्या गरजा पुरविणारी सेवा येथे उपलब्ध नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. मात्र, त्यांच्या पूर्ततेसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

गगनबावडा प. पू. गगनगिरी महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेला किल्ले गगनगड परिसराचा विकास अजून झालेला नाही. त्याचबरोबर रामेश्वर मंदिर, नागझरी तलाव, पळसंबे येथील
प्राचीन रामलिंग गुहा, तेथे बारमाही वाहणारा धबधबा
व त्याच्या विकासाबाबत सर्वच पातळीवर उदासीनता राहिली आहे.

Web Title: Gaganbawda taluka neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.