फक्त बेड टाकून दिखावा, अत्यावश्यक गोष्टीही नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 10:47 PM2020-05-26T22:47:12+5:302020-05-26T22:49:16+5:30
पुरेसा आहार नसल्याने औषधोपचार तरी कसा करायचा असा प्रश्न येथे कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय स्टाफसमोर आहे. उपाशीपोटी औषधोपचार केला आणि औषधाची रिअॅक्शन आली तर त्याला जबाबदार कोण या भीतीपोटी डॉक्टर औषधोपचार करणेही टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे.
चंद्रकांत पाटील ।
गगनबावडा : देशभरात कोरोनाचा कहर वाढत असल्याने प्रशासनाने आरोग्ययंत्रणा मजबूत करण्यावर भर दिला आहे. प्रत्येक तालुका पातळीवर कोविड केअर सेंटर तयार करण्यात आली आहेत; परंतु गगनबावड्यातील कोविड केअर सेंटर म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशीच सध्याची स्थिती आहे.
गगनबावडा तालुक्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या सहा आहे. यापैकी दोन रुग्ण कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये उपचार घेत आहेत. तर उर्वरित चार कोरोनाबाधित रुग्ण गगनबावडा येथील सेंटरमध्ये दाखल आहेत. गगनबावडा येथे सुरू असलेल्या या सेंटरमध्ये मात्र या रूग्णांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.
सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असून पेशंट आणि इतर क्वारंटाईन केलेल्या लोकांना वेळेवर जेवण, पाणी उपलब्ध होत नाही. रुग्णांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर दोन दिवसानंतर त्यांना औषधांचा एक डोस देण्यात येतोय. पुरेसा आहार नसल्याने औषधोपचार तरी कसा करायचा असा प्रश्न येथे कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय स्टाफसमोर आहे. उपाशीपोटी औषधोपचार केला आणि औषधाची रिअॅक्शन आली तर त्याला जबाबदार कोण या भीतीपोटी डॉक्टर औषधोपचार करणेही टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे.
देखरेखीसाठी ठेवलेला पोलीस स्टाफ देखील संसर्ग होऊ नये या भीतीपोटी बिल्डिंग प्रवेशच करत नसून, सेंटरमध्ये ते काही चाललय ते बाहेरून बघण्यापलीकडे काहीच करत नसल्याचे दिसत आहे.
सध्या या ठिकाणी ९० लोक क्वारंटाईन असून काहींना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार यांनी दिली आहे. कोव्हिड केअर सेंटरची संपूर्ण जबाबदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली असून कायम सेवेत असलेले कर्मचारी बाहेरूनच सूचना देण्याचे काम करत आहेत. या ठिकाणी कोरोनोबाधित रुग्ण भरती केले असून त्यांच्यासाठी गरज पडल्यास एकही व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यात आलेले नाही. केवळ बेड टाकून आरोग्य यंत्रणा सुसज्ज असल्याचा दिखावा केला जात असला तरी आतील परिस्थिती मात्र पूर्णत: विरोधी आहे.
आरोग्य सेवेसंदर्भात तालुका आरोग्याधिकारी विशाल चोकाककर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सुरुवातीला याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करत उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच ही सर्व माहिती तहसीलदार यांच्याकडून घेण्यास सांगितले. कोविड सेंटरवर चार डॉक्टर आणि आठ नर्सिंग स्टाफ कार्यरत असल्याचे चोकाककर यांनी सांगितले. पेशंट आणि क्वारंटाईन केलेले लोक यांच्या आरोग्यव्यवस्थेची जबाबदारी आरोग्य विभागाकडे आहे. सेंटरच्या साफसफाईची जबाबदारी बीव्हीजी ग्रुप आणि पंचायत समिती यांच्याकडे आहे. जेवणाची व्यवस्था तहसीलदार कार्यालयाकडून केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या सेंटरमध्ये रुग्ण दाखल झाले नव्हते, तेव्हा प्रशासकीय यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी भेट देत होते; परंतु जेव्हा रुग्ण दाखल केला गेला, तेव्हापासून वरिष्ठांनी कंत्राटी कर्मचाºयांच्या भरवशावर हे सेंटर सोडले आहे. गगनबावडा सेंटरच्या नोडल आॅफिसर तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यांनीही या सेंटरकडे पाठ फिरवली असून, केवळ कागदोपत्री आणि फोनवरून सूचना देण्याचे काम केल्याचे सेंटरमधील एका कर्मचाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
वाढते रुग्ण : तरीही दुर्लक्षच
सेंटरमध्ये तिसऱ्या मजल्यावर कोरोनाबाधित पेशंट असून त्याच्या खालच्या मजल्यावर क्वारंटाईन करण्यात आलेले लोक आहेत. कोरोनाबाधित हे पूर्ण बिल्डिंगमध्ये क्वारंटाईन केलेल्या लोकांच्या संपर्कात येण्याचा धोका जास्त आहे.
कोविड सेंटरवर चार डॉक्टर आणि आठ नर्सिंग स्टाफ कार्यरत. सेंटरचा सर्व कारभार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरोशावर. वरिष्ठ
अधिका-यांनी फिरवली पाठ.
वैद्यकीय सुविधांसह आहार, पाणी, औषधांची तातडीने सोय करण्याची गरज