गायकवाड उद्यान महापालिका ताब्यात घेणार, महापौर, उपमहापौरांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 08:21 PM2019-02-18T20:21:01+5:302019-02-18T20:25:24+5:30
कोल्हापूर : ताराबाई पार्क येथील गायकवाड बंगला ते कारंडेमळा रस्त्यालगतची माजी खासदार कै. उदयसिंगराव गायकवाड उद्यानाची जागा महानगरपालिका ताब्यात ...
कोल्हापूर : ताराबाई पार्क येथील गायकवाड बंगला ते कारंडेमळा रस्त्यालगतची माजी खासदार कै. उदयसिंगराव गायकवाड उद्यानाची जागा महानगरपालिका ताब्यात घेईल, तशा सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापौर सरिता मोरे व उपमहापौर भूपाल शेटे यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. दरम्यान, गायकवाड उद्यान नावाचा फलक तातडीने लावावा, असे पत्र इस्टेट विभागाने ताराबाई पार्क रेसिडेन्सी असोसिएशनला पाठविले आहे.
महापालिकेतील सत्तासंघर्षामुळे गेल्या चार दिवसांपासून गायकवाड उद्यान चर्चेत आहे. उद्यानाची जागा महापालिका प्रशासनाने ताराबाई पार्क रेसिडेन्सी असोसिएशनला भाडेपट्टीने २९ वर्षांच्या कराराने दिली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष नगरसेवक रत्नेश शिरोळकर आहेत.
संस्थेने करार करतेवेळी सदरच्या खुल्या जागेत महापालिकेच्या लेखी परवानगीशिवाय बांधकाम अगर दुरुस्ती, फेरबदल करणार नाही. तसेच जागा भाड्याने देणार नाही, असे लिहून दिले आहे. तरीही या उद्यानात विकास करून ‘आकार गार्डन-केएसबीपी’ असा फलक लावला होता. ही बाब लक्षात येताच महापौर मोरे यांनी आयुक्तांना पत्र लिहून प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, असे कळविले.
त्यानंतर जागे झालेल्या इस्टेट विभागाने संस्थेच्या अध्यक्षांना पत्र लिहून तेथे उदयसिंगराव गायकवाड उद्यान असा फलक लावावा, तसेच महापालिका सभेत झालेल्या ठरावानुसारअंमलबजावणी करावी, असे कळविले. सोमवारी महापौर मोरे व उपमहापौर शेटे यांनी संबंधित संस्थेने करारातील अटी व शर्तींचा भंग केला असल्यामुळे उद्यान महापालिकेच्या ताब्यात घ्यावे, असे आयुक्तांना पत्र दिले. जर प्रशासनाने वेळीच कारवाई केली नाही, तर आम्ही पदाधिकारी, नगरसेवक स्वत: तेथे जाऊन ताबा घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे.