गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 08:00 PM2020-02-15T20:00:08+5:302020-02-15T20:01:23+5:30
गण गण गणांत बोते चा जयघोष, अभिषेक, आरती, पालखी सोहळा, झुणका भाकरीचा प्रसाद अशा मंगलमय वातावरणात शनिवारी श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा पार पडला. यानिमित्त शहरातील श्री गजानन महाराज मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, प्रवचन सह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कोल्हापूर : गण गण गणांत बोते चा जयघोष, अभिषेक, आरती, पालखी सोहळा, झुणका भाकरीचा प्रसाद अशा मंगलमय वातावरणात शनिवारी श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा पार पडला. यानिमित्त शहरातील श्री गजानन महाराज मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, प्रवचन सह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महाद्वार रोडवरील गण गण गणांत बोते भक्त मंडळाच्यावतीने पहाटे श्रींच्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला. धार्मिक सोहळ््याला सामाजिकतेची झालर देत रक्तदान शिबिर घेण्यात आले व रक्तदात्यास मंडळाकडून आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. दुपारी पालखी सोहळ््याला सुरुवात झाली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात फुलांनी सजलेली पालखी मार्गस्थ झाली. बिनखांबी गणेश मंदिर, अंबाबाई मंदिर, भवानी मंडप, मिरजकर तिकटी मार्गे पुन्हा बिनखांबी गणेश मंदिर येथील मंदिरात पालखी विसर्जन झाले. श्रींची आरती झाल्यानंतर भाविकांना झुणका-भाकरी प्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी वारकरी भजनी मंडळाने भजन सादर केले.
सायंकाळी अलंकार निर्मित मराठी भावगीते व भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. आज, रविवारी सायंकाळी श्री गजानन महाराज महिला भजनी मंडळाचा सोंगी भजनाचा कार्यक्रम होईल. उद्या, सोमवारी सकाळी आठ वाजता श्री गजानन विजयग्रंथ सामुदायिक पारायण सोहळा व अकरा वाजता पन्हाळकर बुवा व सहकाऱ्यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर दुपारी बारा वाजता अक्कमहादेवी मंटप येथे श्रींची आरती व महाप्रसाद वाटप होणार आहे.
कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटल येथे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्याची शनिवारी सांगता झाली. आरतीनंतर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. रंकाळा परिसर येथे संग्रामसिंह काशीद यांच्यावतीने गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व महाप्रसादाचे वाटप झाले. यासह पाचगांव पोवार कॉलनीतील गजानन महाराज मंदिर व शहर-उपनगरातील मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.