कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आजपासून ‘गल्ली ते दिल्ली’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:38 AM2020-12-12T04:38:55+5:302020-12-12T04:38:55+5:30
कोल्हापूर : अन्यायकारक कृषी कायदे मागे घेणार नसल्याची केंद्रीय गृहमंत्र्यांनी घोषणा केल्याचा निषेध म्हणून आज, शनिवारपासून कोल्हापुरातील शेतकरी पुन्हा ...
कोल्हापूर : अन्यायकारक कृषी कायदे मागे घेणार नसल्याची केंद्रीय गृहमंत्र्यांनी घोषणा केल्याचा निषेध म्हणून आज, शनिवारपासून कोल्हापुरातील शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने १२ ते २२ डिसेंबर असा ‘गल्ली ते दिल्ली’ आंदोलनाचा कृती कार्यक्रमच जाहीर केला आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात शुक्रवारी समन्वय समितीची बैठक झाली. सतीशचंद्र कांबळे व बाबूराव कदम यांनी माहिती देताना आंदोलनाची तीव्रता वाढविली जाणार असल्याचे सांगितले. या निमित्ताने गावागावांत बांधाबांधांवर जाऊन शेतकऱ्यांचे प्रबोधन केले जाणार आहे. शहरातही सभा घेऊन शहरी नागरिकांसमोरही शेतकऱ्यांची बाजू मांडली जाणार आहे. मोदी सरकार आंदोलनामध्ये फूट पाडत आहे. रावसाहेब दानवे, पीयूष गोयल, चंद्रकांत पाटील हे भाजपचे नेते तर तोंडाला येईल ते बोलत सुटले आहेत. शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या या नेत्यांचा निषेधही या सभांमध्ये केला जाणार आहे. बैठकीला हसन देसाई, संभाजी जगदाळे, बी. एल. बरगे, रवी जाधव हे उपस्थित होते.
असे असणार आंदोलनाचे टप्पे :
१२ डिसेंबर : टोलनाक्यावर टोल देण्यास नकार
१३ डिसेंबर : बिंदू चौकात ‘कॉर्पोरेटधार्जिणे तीन कायदे’ या पुस्तकाचे प्रकाशन
१४ डिसेंबर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
जिल्हाभर संघर्ष यात्रा
कृषी कायद्यांविरोधात लोकांचे प्रबोधन करण्यासाठी १५ ते २२ डिसेंबर अशी सात दिवसीय संघर्ष यात्रा जिल्हाभर फिरणार आहे. सात मिनी बसेसमधून रोज पाच ठिकाणी अशा २५२ सभा होणार आहेत. शहरात सात ठिकाणी तर तालुक्याच्या ठिकाणी आठवडा बाजार असेल तेथे जाहीर सभा होणार आहेत. यानंतर २० रोजी १०० शेतकरी दिल्लीतील आंदोलनात सहभागासाठी रवाना होणार आहेत.
शहरात सात ठिकाणी जाहीर सभा
१६ डिसेेंबर : उभा मारुती चौक
१७ डिसेंबर : राजारामपुरी
१८ डिसेंबर : गंगावेस
१९ डिसेंबर : महाराणा प्रताप चौक
२० डिसेंबर : मध्यवर्ती बसस्थानक
२१ डिसेंबर : सदर बाजार चौक
२२ डिसेंबर : बिंदू चौक