खेळ दिलबहार (ब)चा, विजय पाटाकडील (अ)चा
By admin | Published: February 10, 2015 12:36 AM2015-02-10T00:36:19+5:302015-02-10T00:37:44+5:30
अवधूत घारगे स्मृतिचषक : ऋषिकेश मेथे-पाटीलचा एकमेव गोल
कोल्हापूर : ऋषिकेश मेथे-पाटीलच्या एकमेव गोलवर पाटाकडील तालीम मंडळ (अ)ने दिलबहार तालीम मंडळ (ब)चा १-० असा पराभव करीत अवधूत घारगे चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. सामन्यात ‘दिलबहार’ (ब)च्या खेळाडूंनी अटीतटीचा खेळ करीत बलाढ्य पाटाकडील (अ)ला तब्बल ५७ व्या मिनिटांपर्यंत गोल करण्यापासून रोखून धरल्याने उपस्थित क्रीडारसिकांना या सामन्यात चुरस पाहण्यास मिळाली.
येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर सोमवारी दिलबहार (ब) व पाटाकडील (अ) यांच्यात सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून दिलबहार (ब)कडून शशांक माने, स्वप्निल भोसले, सुशील माने, लखन मुळीक, निखिल कुलकर्णी यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत सातत्याने चेंडू पाटाकडील(अ)च्या गोलक्षेत्रात ठेवला. पाटाकडील(अ)कडून विन्सेंट, अक्षय मेथे-पाटील, अजिंक्य नलवडे, ऋषिकेश मेथे-पाटील यांनी गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, योग्य समन्वयाअभावी त्यांच्या गोल करण्याच्या अनेक संधी वाया गेल्या. उलट दिलबहार(ब)ने पूर्वार्धात उत्कृष्ट खेळ करीत पाटाकडील(अ)वर वारंवार चढाया करीत सामन्यावर वर्चस्व राखले. पूर्वार्धात दिलबहार (ब)ने सामन्यावर वर्चस्व निर्माण केले होते. पाटाकडील (अ) संघात ऋषिकेश मेथे-पाटील, सैफ हकीम, रुपेश सुर्वे, नियाज पटेल,अक्षय मेथे-पाटील असे एकापेक्षा एक स्टार खेळाडू असतानाही दिलबहार(ब)ने झुंजविले.
उत्तरार्धात पाटाकडील(अ)कडून आक्रमक व वेगवान खेळाचे प्रदर्शन करीत दिलबहार(ब) च्या गोलक्षेत्रात गोल करण्यासाठी अनेकदा धडक मारण्यात आली. यामध्ये पाटाकडील(अ)च्या रुपेश सुर्वे, नियाज पटेल, ऋषिकेश मेथे-पाटील, अक्षय मेथे-पाटील, विन्सेंट यांनी कधी डाव्या बाजूने, तर कधी उजव्या बाजूने चढाई करीत गोल करण्याचे प्रयत्न केले. सातत्याने आक्रमणे दिलबहार(ब)च्या बचाव फळीकडून परतावल्या जात होत्या. ५७ व्या मिनिटास पाटाकडील(अ) च्या ऋषिकेश मेथे-पाटील याने मैदानी गोल करत गोलशू्न्यची कोंडी अखेर फोडली. १-० ने मागे असलेल्या दिलबहार(ब)ने गोल फेडण्यासाठी जंग जंग पछाडले. दिलबहार(ब)कडून शशांक माने, निखिल कुलकर्णी, लखन मुळीक यांनी गोल करण्याचे प्रयत्न केले. मात्र, पाटाकडील(अ) चा गोलरक्षक शैलेश पाटील याने ते परतावून लावले. अखेरच्या काही क्षणात पाटाकडील(अ) कडून रुपेश सुर्वे, धैर्यशील पवार यांच्या गोल करण्याच्या सोप्या संधी वाया गेल्या. अखेरपर्यंत दिलबहार(ब)ला सामन्यात कमबॅक करता न आल्याने सामना पाटाकडील (अ) ने १-० असा जिंकला. (प्रतिनिधी)