बाळासाहेब देसार्इंना शब्द देत गणपतराव आंदळकरांनी पटकावली होती हिंदकेसरीची गदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:28 AM2018-09-17T00:28:40+5:302018-09-17T00:29:05+5:30

Ganapatrao Andalkar gave words to Balasaheb Desai, Hindkeshari maida | बाळासाहेब देसार्इंना शब्द देत गणपतराव आंदळकरांनी पटकावली होती हिंदकेसरीची गदा

बाळासाहेब देसार्इंना शब्द देत गणपतराव आंदळकरांनी पटकावली होती हिंदकेसरीची गदा

googlenewsNext

गोरापान, कमनीय बांधा, ताकदवान पंजे, उंचपुऱ्या देहयष्टीचे गणपत आंदळकर आखाड्यात उतरले की संपूर्ण मैदानभर उत्साह संचारलेला असायचा. कुस्ती शौकीनांना एक प्रचंड उत्सुकता लागून राहिलेली असायची. प्रतिस्पर्धी मल्लाचे धाबे धणाणलेले असायचे. आपल्या अचाट शक्तीच्या आणि चपळ डावपेचाच्या जोरावर गणपत आंदळकर प्रतिस्पर्धी मल्लाला बघता बघता चारीमुंड्या चितपट करायचे. १९६० चे दशक आंदळकरांच्या कुस्तीमधील कारकीर्दीने यशोशिखर गाठले होते. त्या काळात त्यांचा सर्वत्र दबदबा निर्माण झाला होता. आंदळकरांची कुस्ती म्हटले की विजय हा ठरलेलाच. देश विदेशातील अनेक मल्लांबरोबर त्यांची कुस्ती झाली, पण पराजय कधी पाहिला नाही. आंदळकर प्रतिस्पर्ध्याच्या छाताडावर बसलेले अनेकांनी पाहिले.
१९६० मध्ये मुंबईत वल्लभभाई पटेल स्टेडियमवर दुसरी हिंदकेसरी स्पर्धा झाली. या स्पर्धेत त्यांना खेळण्याची संधी मिळाली. स्पर्धा सुरु झाल्यानंतर पहिल्या दोन तीन दिवसात आंदळकरांना कुस्ती खेळायची आहे हे कोणीच सांगितले नव्हते. तिसºया दिवशी अचानक आंदळकरांना सांगण्यात आले की तुला कुस्ती खेळायची आहे.
आंदळकर म्हणाले, ‘मी आता जेवून आलोय शिवाय माझी लंगोटही आणलेली नाही. तुम्ही सांगताय तर मी उद्या याच वेळी कुस्ती खेळीन.’ तत्कालिन गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांनी आंदळकरांना आग्रह केला. महाराष्ट्राची लाज राखायला पाहिजे, म्हणून तुला कुस्ती खेळावीच लागेल अशा शब्दात त्यांनी बजावले. आंदळकरांनीही चांगल्या कामगिरीचा शब्द दिला.
दुसºया दिवशी आंदळकर पूर्ण तयारीनिशी स्टेडियमवर आले. हिंदकेसरी गटात एकूण सोळा मल्ल खेळणार होते. आंदळकरांनी पहिल्या राऊंडची कुस्ती जिंकली, दुसºया राऊंडचीही कुस्ती त्यांनी जिंकली. तिसºया राऊंडला उपात्यपूर्व लढतीत बनातसिंग पंजाबी (अमृतसर) या मल्लाबरोबर त्यांची कुस्ती झाली. अत्यंत प्रेक्षणिय अशी ही लढत झाली. अखेर गणपत आंदळकरांना गुणावर विजयी घोषित करण्यात आले. देशातील सर्वोच्च मानाची अशी हिंदकेसरी गदा पटकावण्याचे स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण होण्यास काही क्षणाची प्रतिक्षा राहिली होती. हिंदकेसरीसाठी अंतिम लढत गणपत आंदळकर आणि खडकसिंग पंजाबी (दिल्ली) यांच्यात झाली. अख्खे स्टेडियम कुस्ती शौकीनांच्या गर्दीने खचाखच भरले होते. खडकसिंग पंजाबी हा मल्ल सुध्दा तगडा आणि ताकदवान होता. त्याच्या तुलनेत आंदळकरही चपळ, ताकदीचे होते. अंतिम लढतअत्यंत लक्षणिय, प्रेक्षणिय अशी ही लढत होती. परंतू डावपेचात माहीर असलेल्या आंदळकरांनी बुध्दीमत्तेच्या जोरावर प्रतिस्पर्धी मल्लावर गुणांची कमाई केली. या गुणांच्या जोरावरच आंदळकरांनी हिंदकेसरीची गदा पटकावली.
चौथीपर्यंत शिक्षण : पुनवत येथे चौथीपर्यंत प्राथमिक शिक्षण झाले. मूळ नाव गणपती पांडुरंग माने (आंदळकर) हे होते. त्यांचा जन्म १९२८ मध्ये झाला होता. शिराळा खुर्द येथे आजोबा कृष्णाजी पाटील यांच्याकडे ते दत्तक गेले. त्यांचे नाव गणपतराव कृष्णाजी पाटील असे झाले. मात्र गणपतराव आंदळकर म्हणूनच ओळखले जात.

Web Title: Ganapatrao Andalkar gave words to Balasaheb Desai, Hindkeshari maida

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.