गणपतराव देशमुख यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:10 AM2018-04-13T00:10:45+5:302018-04-13T00:10:45+5:30
कोल्हापूर : वंचितांच्या न्यायासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या यशवंत प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (दि. १५) यशवंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विवेक कोकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विधानसभेतील सर्वांत ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांना ‘महाराजा यशवंतराव होळकर जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे.
शाहू स्मारक भवनात सकाळी दहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन जलसंधारण मंत्री राम शिंदे, आमदार प्रकाश अण्णा शेंडगे, तसेच भूषणसिंहराजे होळकर, अमरजितराजे बेरघळ यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी समाजातील विविध क्षेत्रांतील आदर्श व्यक्तींना विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी शाहीर डॉ. अमोल रणदिवे हे अहिल्यादेवींचा जीवनपट उलगडणारा पोवाडा सादर करणार आहेत. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील बिरुदेव गजी मंडळ, निंबवडे यांच्या वतीने गजनृत्याचे सादरीकरण, विविध ओविकार मंडळांच्या ओव्या असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. परिषदेस डॉ. बाबूराव हजारे, सचिन मदने, बाबासाहेब उबाले, सागर मासाळ उपस्थित होते.