गणपतराव पाटील यांनी जिल्हा बँकेची निवडणूक लढवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:28 AM2021-08-14T04:28:20+5:302021-08-14T04:28:20+5:30
(फोटो- १३०८२०२१-कोल-गणपतराव पाटील) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे अध्यक्ष, ज्येष्ठ ...
(फोटो- १३०८२०२१-कोल-गणपतराव पाटील)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लढवावी, असा आग्रह त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून पालकमंत्री सतेज पाटील यांनी पाटील यांना संधी द्यावी, अशी मागणीही केली जाणार आहे.
ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील यांच्याकडे सहकारातील अभ्यासू नेतृत्व म्हणून पाहिले जाते. अडचणीच्या काळात साखर कारखानदारी कशी चालवावी, हा आदर्श एका बाजूला घालून देत असताना त्यांनी शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनी पिकाखाली आणण्याचे काम केल्याने शेतकऱ्यांसह सामान्य माणसांमध्ये त्यांच्याविषयी आपुलकीची भावना आहे. लोकसभा, विधानसभा व गोकुळ निवडणुकीत त्यांनी आघाडी धर्माचे पालन करत आघाडीला पाठबळ दिले. त्यांचा राष्ट्रवादी काॅंग्रेसशी चांगला समन्वय आहे. त्यांच्या ज्ञानाचा फायदा जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी त्यांच्यासारखे नेतृत्व बँकेत जाणे गरजेचे असल्याचे दत्त उद्योग समूहाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे गणपतराव पाटील यांच्या उमेदवारीसाठी मागणीही केली जाणार आहे.