यड्रावच्या सान्वी, गणेशला लवकरच मिळणार पालकत्व!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 01:19 AM2018-10-09T01:19:19+5:302018-10-09T01:20:57+5:30
यड्राव : येथील खुनाच्या घटनेत आईचा मृत्यू, तर वडील आरोपी असल्याने पोलिसांच्या ताब्यात अशा विचित्र परिस्थितीत सापडलेली सान्वी जगताप व गणेश जगताप या बहीण-भावाला अब्दुललाट येथील विद्यार्थी विकास प्रबोधिनीच्या बालोद्यान संस्थेने पालकत्व देण्याची तयारी दर्शविली आहे. याबाबत या मुलांच्या नातेवाइकांकडून येणारा सकारात्मक प्रतिसाद या दोघांचे भवितव्य ठरविणार आहे. संस्थेला नातेवाइकांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.
यड्राव येथे शनिवारी घडलेल्या हत्याकांडातील प्रदीप जगताप याने पत्नी, सासू, मेहुणी व मेहुणा यांच्यावर हल्ला करून खून केला. या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. मृत झालेल्या रूपाली जगताप हिची सान्वी ही अकरा वर्षांची मुलगी, तर गणेश हा चार वर्षांचा मुलगा आहे. आई या दुर्घटनेत मृत, तर वडील हत्यारा असल्याने पोलिसांच्या ताब्यात, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाल्याने या चिमुकल्यांचे भवितव्य काय? असा यक्ष प्रश्न पडला होता.
सामाजिक बांधीलकी जपणारी समाजात अनेक मंडळी व संस्था आहेत. अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील विद्यार्थी विकास प्रबोधिनी संस्थने २००९ मध्ये बालोद्यान ही संस्था सुरू केली आहे. समाजातील अनाथ, निराधार मुलांना आधार देऊन त्यांना स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभारी देण्याचा प्रयत्न ही संस्था करते. या संस्थेने मातृत्वापासून पोरक्या झालेल्या व पितृत्वापासून दुरावलेल्या सान्वी व गणेश जगताप या दोघांना पालकत्व देण्याची मानसिकता त्यांच्या नातेवाइकांसमोर व्यक्त केली आहे.संस्थेचे अध्यक्ष कुलभूषण बिरनाळे यांनी प्रदीप जगताप याच्या नातेवाइकांशी संपर्क साधून सान्वी व गणेश यांना दत्तक घेण्यास तयार असल्याचे स्पष्ट करून दोघेही स्वत:च्या पायावर उभे राहण्याची क्षमता येईपर्यंत त्यांचे पालन पोषण व संगोपन करण्याची जबाबदारी घेणार असल्याचे त्यांना सांगितले आहे. याबाबत जगताप यांच्या नातेवाइकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर दोन चिमुकल्यांचे भवितव्य उज्ज्वल होणार आहे.
सान्वी आणि गणेश यांचे शिक्षण, संस्कार, आरोग्य, उद्योग किंवा नोकरी लागेपर्यंतची संपूर्ण जबाबदारी घेणार आहे. नातेवाइकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे महत्त्वाचे आहे. संस्थेमध्ये सध्या बालवाडी ते उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वयापर्यंतची मुले आहेत.
- कुलभूषण बिरनाळे, अध्यक्ष, बालोद्यान संस्था अब्दुललाट