गांधी जयंतीला राज्यातील १२५ कैद्यांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:41 AM2019-09-29T00:41:23+5:302019-09-29T00:42:04+5:30
कारागृह प्रशासनाने या कैद्यांच्या सुटकेचा गांधीजींच्या जन्माच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त निरोपाचा आगळावेगळा कार्यक्रमही आयोजित केला आहे. यंदाचा दसरा आणि दिवाळी सण या कैद्यांना कुटुंबीयांसोबत साजरा करण्याचे भाग्य मिळाले आहे. या गोड बातमीने कुटुंबीयांचा आनंदही ओसंडून वाहत आहे.
एकनाथ पाटील ।
कोल्हापूर : कारागृहात आल्यापासून चांगली वर्तणूक, शांत स्वभाव, नीटनेटकेपणा, कष्ट करण्याची तयारी, इतरांशी आपुलकीने बोलणे अशा सर्वसंपन्न गुण प्राप्त केलेल्या कैद्यांना दोन ते अडीच वर्षांच्या शिक्षेत सूट मिळाली आहे. २ आॅक्टोबरला गांधीजींच्या जन्माला १५० वर्षे पूर्ण होत असल्याने केंद्र शासनाकडून ‘गांधी वर्ष’ साजरे केले जात आहे. देशातील तीन हजार कारागृहांत कार्यक्रम होत असून, गांधी जयंतीला राज्यातील ५२ कारागृहांतून १२५ कैद्यांची सुटका होत आहे. त्यामध्ये कळंबा कारागृहातील १० कैद्यांचा समावेश आहे.
कारागृह प्रशासनाने या कैद्यांच्या सुटकेचा गांधीजींच्या जन्माच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त निरोपाचा आगळावेगळा कार्यक्रमही आयोजित केला आहे. यंदाचा दसरा आणि दिवाळी सण या कैद्यांना कुटुंबीयांसोबत साजरा करण्याचे भाग्य मिळाले आहे. या गोड बातमीने कुटुंबीयांचा आनंदही ओसंडून वाहत आहे.
महाराष्टÑात ५२ कारागृहे आहेत. समाजातील काही व्यक्तींकडून कळत-नकळतपणे, अनवधानाने किंवा रागाच्या भरात घडलेल्या एका चुकीमुळे अनेक तरुण बंदी विविध कारागृहांत न्यायालयाने दिलेली शिक्षा भोगत आहेत. जीवनातील उमेदीचा काळ कारागृहातच जातो. गुन्हा करून शिक्षा भोगण्यास आलेल्या कैद्यांना कारागृहाच्या नियमावलीच्या चाकोरीत राहावे लागते. सात ते चौदा वर्षे आणि आजन्म कारावास अशी शिक्षेची तरतूद आहे. कारागृहात पडेल ते काम करण्याची तयारी, चांगली वर्तणूक, शांत स्वभाव, समोरच्याशी आपुलकीने बोलणे, आदी कैद्यांच्या रोजच्या दिनमानाची नोंद कारागृहात ठेवली जाते. चार वर्षे शिक्षा अतिशय चांगल्या प्रकारे भोगली आहे व कैद्यांच्या मानसिकतेत चांगला बदल झाला आहे, याची खात्री कारागृह अधीक्षकांना झाल्यानंतर ते शासनाच्या नियमावलीच्या कक्षेत राहून कैद्यांना शिक्षेत सूट देतात. त्यानिमित्त २ आॅक्टोबरला नियमात बसलेल्या ६० वर्षांवरील पुरुष व ५५ वर्षांच्या पुढील महिला कैद्यांची शिक्षा माफ करून त्यांना घरी सोडण्याचा निरोपाचा कार्यक्रम एकाच वेळी देशातील तीन हजार कारागृहांत आयोजित करण्यात आला आहे.
कमिटी घेते सुटकेचा निर्णय
खुनाच्या गुन्ह्यात आजन्म कारावासाची शिक्षा झालेल्या कारागृहातील दोन महिलांसह १५ कैद्यांना आतापर्यंत १४ वर्षांच्या शिक्षेनंतर घरी सोडून दिले आहे. या शिक्षेत कैद्याला शेवटच्या श्वासापर्यंत कारागृहात राहावे लागते; परंतु त्याची वर्तणूक चांगली असेल, त्याचे वय ६५ च्या पुढे असेल तर शासनाने नियुक्तकेलेले कारागृह अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक यांची समिती या कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेते.
‘कळंबा’तील दहा कैद्यांचा समावेश
कळंबा कारागृहाने गेल्या वर्षभरात स्वत:च्या स्वभावात आणि मानसिकतेत चांगला बदल करणाऱ्या ११ कैद्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे शिक्षेत सूट देऊन घरी सोडले आहे. २ आॅक्टोबरला आणखी दहा कैद्यांची सुटका केली जाणार आहे.
- शरद शेळके, कारागृह अधीक्षक, कळंबा मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर.