शिवाजी विद्यापीठात साकारणार ‘गांधी कुटी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:05 AM2018-10-02T00:05:48+5:302018-10-02T00:05:52+5:30
संतोष मिठारी।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महात्मा गांधी यांचा जीवनप्रवास आणि कार्याचा प्रचार, प्रसार करण्याच्या उद्देशाने शिवाजी विद्यापीठात ‘गांधी कुटी’ साकारण्यात येणार आहे. विद्यापीठातील गांधी अभ्यास केंद्राने हा प्रकल्प हाती घेतला आहे. वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन केंद्राने केले आहे.
या केंद्राने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विद्यापीठामध्ये ‘गांधी कुटी’ साकारण्याचा निर्णय घेतला आहे. एक एकर जागेमध्ये ही कुटी वर्धा आणि साबरमती आश्रम नजरेसमोर ठेवून उभारली जाणार आहे. त्यासाठी पारंपरिक साधने आणि साहित्याचा वापर केला जाईल. या कुटीमध्ये गांधीजी यांचा जीवनप्रवास, कार्यावर आधारित छायाचित्रे आणि पुस्तकांचे प्रदर्शन असणार आहे. अभ्यास केंद्राचे कार्यालय येथे राहणार आहे. कुटी साकारण्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
विद्यापीठात ‘गांधी कुटी’ उभारण्याचा उद्देश हा महात्मा गांधी यांचे जीवन, कार्य आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करणे हा आहे. या कुटीच्या प्रकल्पाचा प्राथमिक स्वरूपातील आराखडा विद्यापीठाला सादर केला असल्याचे गांधी अभ्यास केंद्राच्या समन्वयक प्रा. डॉ. भारती पाटील यांनी सांगितले. लोक वर्गणीतून हा प्रकल्प पूर्ण केला जाणार असून समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी यासाठी मदतीचा हात द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
‘गांधी कुटी’ साकारण्याबाबतचा प्राथमिक स्वरूपातील प्रस्ताव गांधी अभ्यास केंद्राने मांडला असून त्यावर लवकरच कार्यवाही केली जाईल.
-कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे