गांधी मैदानाचा झाला तलाव... पाणी निचरा होणारी यंत्रणा जुनाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:23 AM2021-05-08T04:23:15+5:302021-05-08T04:23:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पाणी निचरा होण्यासाठीची यंत्रणा जुनाट झाल्यामुळे पाणी पुढे सरकत नसल्याने गांधी मैदानाचा सध्या पाण्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पाणी निचरा होण्यासाठीची यंत्रणा जुनाट झाल्यामुळे पाणी पुढे सरकत नसल्याने गांधी मैदानाचा सध्या पाण्याचा तलाव झाला आहे. पाणी निचरा होणारी यंत्रणा नव्याने केली जाणार नाही, तोपर्यंत पावसाळ्यात मैदानाची दुर्दशाच होणार आहे. प्रत्येक वर्षी उद्भवणाऱ्या या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या मैदानाचा विकास करून प्रचंड राजकीय ईर्षा दाखविण्यात येत असली, तरी तो विकास फक्त डिजिटल फलकापुरताच मर्यादित राहिल्याचे उघड होत आहे.
महानगरपालिकेच्या मालकीचे गांधी मैदान परिसरातील नागरिकांसाठी, खेळाडूंसाठी उपयुक्त असे मैदान आहे. परंतु, ते खालच्या बाजूला असल्याने नंगीवली चौक, टिंबर मार्केटपासून पावसाळ्यात येणारे सांडपाणी थेट मैदानात घुसते. हे सांडपाणी मैदानाच्या बाजूने वळविण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. या मैदानाच्या पश्चिमेच्या बाजूने एक ओढा आहे, तो सांडपाणी वाहून नेतो. परंतु, मैदानात साचणारे पावसाळ्यातील पाणी वाहून नेण्याची त्याची क्षमता नाही.
मैदानाजवळून वाहणारा नाला पुढे बलभीम बँकेच्या इमारतीपासून गजानन काशिद यांच्या घरापासून ब्रम्हेश्वर पार्कला जोडला आहे. पन्नास वर्षांपूर्वी या नाल्याचे काम झाल्यामुळे तो वीस फुटांपेक्षा जास्त खोल आहे. परंतु, याच नाल्यात गाळ, दगड, कचरा अडकल्यामुळे तो तुंबला आहे. पाणी पुढे सरकण्यास वाव नाही. नाल्याचे नळे साफ करण्यातही मोठ्या अडचणी आहेत. गेल्या काही दिवसात झालेल्या पावसाने गांधी मैदान पाण्याने पूर्ण भरले आहे. या पाण्याला नाल्यातून पुढे सरकता येत नसल्याने ते तसेच साचून राहिले आहे. दोन दिवसांपूर्वी नाला जेट मशीन लावून साफ करण्याचा प्रयत्न केल्याने पाणी हळूहळू पुढे सरकत आहे.
दुर्गंधीमुळे त्रास...
मैदानावर पाणी अनेक दिवसांपासून साचून राहिल्याने ते काळे पडले आहे. मैदानावरील माती, गवत, कचऱ्यामुळे दलदल निर्माण झाली आहे. पाण्याची दुर्गंधीही सुटली आहे. डासांचे प्रमाणही वाढले आहे. मैदानात साचून राहिलेले पाणी आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी बनले आहे.
राजकीय ईर्षा तरीही दुर्दशा -
मध्यंतरी गांधी मैदान विकासाची मोठी स्पर्धा झाली, पण ही स्पर्धा काही मैदानाला वाचवू शकत नाही, हेच साचलेल्या पाण्यावरुन दिसून येते. एक कोटी दहा लाख रुपयांचा विकास करण्यात आला, आणखी एक कोटींची निधी देण्यात आल्याची जाहिरातबाजी झाली. त्याचे डिजिटल फलकही झळकले, परंतु हा विकास फलकापुरताच राहिला असून, प्रत्यक्षात प्रत्येक पावसाळ्यात मैदान तलाव होण्याचे थांबत नाही.
(सूचना - फोटो कोल डेस्कवर पाठवित आहे.)