गांधीनगर सरपंचांना अब्रुनुकसानीची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:55 PM2019-02-22T12:55:28+5:302019-02-22T12:56:35+5:30
गांधीनगर : येथील सरपंच रितु लालवाणी यांंनी आमच्याकडून आपल्या जिवितास धोका असल्याबाबतची खोटी तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करून बदनामी ...
गांधीनगर : येथील सरपंच रितु लालवाणी यांंनी आमच्याकडून आपल्या जिवितास धोका असल्याबाबतची खोटी तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे करून बदनामी केल्याबध्दल ५० लाख रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा का करू नये अशी नोटीस अशोक चंदवणी यांनी वकिलामार्फत बजावली. अशीच नोटीस ग्रामपंचायत सदस्य गोपिचंद कुकरेजा व प्रताप चंदवाणी यांनीही प्रत्येकी दहा लाख रुपये नुकसानभरपाईची नोटीस बजावली आहे.
सरपंच लालवाणी यांनी १३ फेब्रुवारीस हा तक्रार अर्ज दिला आहे. त्यात त्यांनी अशोक चंदवाणी, गोपीचंद कुकरेजा, प्रताप चंदवाणी हे अतिक्रमण काढले व न काढले तरी तक्रार करून त्रास देतात. ते माझ्यावर जातीवाचक केस नोंदवण्याची धमकी देतात अशी तक्रार केली आहे. परंतू आम्ही तिघांनी ग्रामपंचायतीविरोधात कोणतेही आंदोलन केलेले नाही.
आपली बेकायदेशीर कृत्ये लपविण्यासाठी त्या आमच्यावर खोटे आरोप करत आहेत. सरपंच व आम्हीही सिंधी समाजाचे आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर जातीवाचक केस नोंदवूच शकत नाही. म्हणून त्यांनी केलेल्या कोणत्याही आरोपात तथ्त नाही. त्यांनी बिनबुडाचे व खोटे आरोप केल्याने त्यांच्याविरोधात कलम ४९९ व ५०० अंतर्गत फौजदारी प्रक्रियेला सामोरे जाण्याची नोटीस लागू केली आहे.