कलशेट्टी यांच्या बदलीच्या निषेधार्थ गांधीच उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 07:17 PM2020-10-13T19:17:07+5:302020-10-13T19:18:48+5:30
commissioner, transfar, muncipalcarporation, kolhapurnews महानगरपालिकेचे माजी आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांची बदली रद्द करावी या मागणीसाठी मंगळवारी दुपारी चक्क गांधीजीच रस्त्यावर उतरले. महानगरपालिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी जात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या भावना कळवल्या.गांधीच्या वेषातील हे अभिनव आंदोलन शहरवासीयासाठी कुतूहलाचा विषय ठरले.
कोल्हापूर: महानगरपालिकेचे माजी आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांची बदली रद्द करावी या मागणीसाठी मंगळवारी दुपारी चक्क गांधीजीच रस्त्यावर उतरले. महानगरपालिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी जात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या भावना कळवल्या.गांधीच्या वेषातील हे अभिनव आंदोलन शहरवासीयासाठी कुतूहलाचा विषय ठरले.
कलशेट्टी यांची अचानक बदली झाल्याने कोल्हापुरातील सर्वसामान्य माणूस हळहळला आहे. बदली करण्याच्या प्रवृत्तीविरोधात तो रोज वेगवेगळ्या प्रकारात व्यक्त होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत बदली रद्दच्या मागण्याही केल्या जात आहेत. मंगळवारची दुपारही त्याला अपवाद नव्हती.
गांधीजीचा वेश धारण करुन अंगभर पंचा आणि हातात काठी घेउन साहेबराव काशिद हा तरुण रस्त्यावरुन चालत निघाला. त्यांच्यासोबत शिवाजी पेठेतील राजे संभाजी तरुण मंडळाचे प्रवीण पवार,आचारी संघटनेचे संदीप लाड, मुस्लीम समाजाचे आश्पाक बागवान, घोडा संघटनेचे जावेद बागवान यांनीही सहभाग घेतला.
महापूर आणि कोरोना महामारीच्या काळात रस्त्यावर उतरुन प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कलशेट्टी यांना आयुक्त म्हणून पुन्हा आणा असे फलक हातात घेउन त्यांनी आयुक्तांची बदली रद्द करा अशा घोषणाही दिल्या. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेअन मागणीचे निवेदन दिले.