कोल्हापुरात टोलनाक्यांवर ‘गांधीगिरी’
By admin | Published: October 2, 2014 11:01 PM2014-10-02T23:01:29+5:302014-10-02T23:51:09+5:30
वाहनधारकांचाही प्रतिसाद : कृती समितीचे आंदोलन शांततेत
कोल्हापूर : सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रा. एन. डी. पाटील व अॅड. गोविंद पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज, गुरुवारी फुलेवाडी, शाहू, शिये व शिरोली टोलनाक्यांवर ‘गांधीगिरी’ पद्धतीने आंदोलन केले. सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत नाक्याच्या दोन्ही बाजूंना २०० मीटर अंतरांवर थांबून कार्यकर्त्यांनी वाहनधारकांना टोल न देण्याची विनंती केली. ‘टोल देणार नाही’ची स्टिकर वाहनावर
चिकटविली जात होती. वाहनधारकांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादामुळे गांधी जयंतीनिमित्त केलेले हे आंदोलन अत्यंत शांततेत पार पडले.
शहराच्या उत्तर-दक्षिण-पूर्व-पश्चिम अशा या चारही मुख्य नाक्यांवर सकाळी दहा वाजता टोलविरोधी कृती समितीचे कार्यकर्ते जमा झाले. नाक्यांच्या दोन्ही बाजूंना थांबून वाहनधारकांना विनंती करण्याचे नियोजन आंदोलकांनी केले. हातात लाल निशाण घेत ‘देणार नाही... देणार नाही... टोल आम्ही देणार नाही’ या घोषणांनी परिसर दुमदुमला.
शिरोली नाक्यावर अशोक पोवार, दिलीप देसाई, बुरहान नायकवडी, एम. बी. पडवळे, बाबा पार्टे, महादेव पाटील, बजरंग शेलार, दीपाताई पाटील, वैशाली महाडिक, मीरा मोरे, चारुलता चव्हाण, सुजाता पाटील, गीता राऊत यांनी वाहनधारकांना थांबवून टोल न देण्याची विनंती केली.