गांधीनगर व्यापारी पेठ साडेतीन महिन्यांनंतर खुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:17 AM2021-07-20T04:17:27+5:302021-07-20T04:17:27+5:30
गांधीनगर : तब्बल साडेतीन महिन्यांनंतर गांधीनगर बाजारपेठेतील शटरची कुलपे उघडून सोमवारी व्यवसाय सुरू झाला. ठप्प झालेली कोट्यवधीची उलाढाल ...
गांधीनगर : तब्बल साडेतीन महिन्यांनंतर गांधीनगर बाजारपेठेतील शटरची कुलपे उघडून सोमवारी व्यवसाय सुरू झाला. ठप्प झालेली कोट्यवधीची उलाढाल पुन्हा एकदा सुरू झाल्याने व्यापारी वर्गात उत्साह निर्माण झाला आहे. व्यावसायिक तसेच कामगारांवर आलेले आर्थिक अरिष्ट प्रशासनाने काही अंशी वेळेचे निर्बंध घालून दूर केले आहे. व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिल्याने व्यावसायिकांच्या डोक्यावरचे ओझे खांद्यावर येण्यास मदत होणार आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तब्बल एकशे पाच दिवसांपासून ठप्प झालेली गांधीनगर बाजारपेठ पुन्हा सुरू झाली आहे. ग्राहकांची रेलचेल खरेदीसाठी वाढल्याने काही अंशी व्यापाऱ्यांना आणि व्यापारी पेठेवर अवलंबून असणारे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक तसेच भाडोत्री वाहनधारक, माथाडी कामगार, दुकानांमध्ये काम करणारे हेल्पर, कारागीर यांना दिलासा मिळाला आहे. रेडिमेड शूटिंग, शर्टिंग कापड, स्पेशल साड्यांची दुकाने, प्लायवूड, होजियरी, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक, कटलरी, कॉस्मेटिक, ज्वेलरी, हॅण्डलूम, लहान मुलांची खेळणी, प्लास्टिक, किड्स वेअर, लेडीज वेअर, होलसेल व रिटेल मिळून साडेतीन ते चार हजार दुकाने पुन्हा सुरू झाले आहेत. जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाला या माहामारीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवसाय बंद ठेवावे लागले. या बंदसदृश स्थितीमुळे जिल्ह्याच्या व्यापारीकरणावर विपरीत परिणाम झाला आहे. अनेक व्यावसायिक आर्थिक अरिष्टात सापडले. वेळेचे बंधन का होईना, पण व्यवसाय सुरू झाल्याने व्यापारी वर्ग सुखावला आहे.
नियम पाळणे गरजेचे
जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्ह रेट अजूनही संकट उभा करणारा असल्याने येथील व्यापाऱ्यांनी अनावश्यक गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर व मास्क वापरण्यावर भर देऊन शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरज आहे.
कारवाई हवीच
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने घालून दिलेले सकाळी ७ ते सायंकाळी चारपर्यंत सर्व व्यवसाय सुरू राहतील. तसेच वेळेचे बंधन न पाळणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर दंडात्मक व गुन्हे दाखल होणार असल्याने व्यापाऱ्यांनी नियम पाळण्याची गरज आहे.
फोटो ओळ-गांधीनगर बाजारपेठ सुरू झाल्याने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. (छाया : अनिल निगडे)