गांधीनगर-रुकडी पर्यायी मार्ग होणार
By admin | Published: November 2, 2015 12:18 AM2015-11-02T00:18:13+5:302015-11-02T00:34:48+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाचा हिरवा कंदील : गांधीनगर मुख्य मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार
मोहन सातपुते ल्ल उचगाव
गांधीनगर (ता. करवीर) येथील पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग एन.एच. ४ पासून रुकडी असा पर्यायी मार्ग बनविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. या रस्त्याच्या कामाला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गडमुडशिंगीच्या हद्दीतून रेल्वे मार्गाच्या लाईनच्या पलीकडून हा रस्ता होणार आहे. या पर्यायी रस्त्यामुळे गांधीनगरच्या मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा पडणारा ताण कमी होणार आहे. गांधीनगरच्या बाजारपेठेमुळे गुंतागुंतीचा बनलेला मुख्य रस्ता अतिजोखमीचा व वाहनधारकांची डोकेदुखी वाढविणारा असल्याने हा मार्ग झाल्यास गांधीनगरात येणाऱ्या वाहनांची संख्या कमी होऊन रहदारीवर नियंत्रण मिळविता येणार आहे.
कोल्हापूरहून इचलकरंजीला जाण्यासाठी कोल्हापूर-सांगली महामार्गाचा वापर होत आहे; मात्र हे अंतर कमी करण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून तावडे हॉटेलकडून गांधीनगरमार्गे रुकडी पूल असा प्रस्ताव होता. त्यासाठी रुकडी नदीवर असलेल्या मोठ्या पुलाला मंजुरी मिळाली; मात्र हा पूल नव्याने बांधताना गांधीनगरच्या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीच्या प्रचंड कोंडीचा प्रश्न पुढे आला.
आता गांधीनगर बाजारपेठेचा विस्तार वाढल्याने गांधीनगरच्या मुख्य रस्त्यावर गेल्या कित्येक वर्षांपासून वाहतुकीची कोंडी होत आहे. पर्यायी रस्ताच नसल्याने ही कोंडी फोडण्यात अद्यापही यश आले नाही. आता यावर तोडगा काढण्यासासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग पावले उचलत आहे. या रस्त्याला पर्यायी रस्ता आणि इचलकरंजीला जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग (हायवे) ते रुकडी असा नवा रस्ता होणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाच्या बांधकाम विभागाला पाठविण्यात येणार आहे. तत्पूर्वी या रस्त्याचा सर्व्हे येत्या दोन महिन्यांत होणार आहे. भूसंपादन प्रक्रियाही गतिमान होणार आहे.
पर्यायी रस्ता झाल्याशिवाय गांधीनगरच्या मुख्य रस्त्याची कोंडी फुटणार नाही. त्यामुळे बायपास रस्त्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळविण्यासाठी आमदार अमल महाडिक प्रयत्नशील आहेत. भूसंपादन आणि सर्व्हेच्या कामाला प्राधान्य देण्यात येणार आहे.
- बी. एस. उगले, उपअभियंता,
सा. बां. विभाग, कोल्हापूर.