गांधीनगर जागेप्रश्नी चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच
By Admin | Published: May 16, 2015 12:13 AM2015-05-16T00:13:32+5:302015-05-16T00:14:42+5:30
सर्किट हाऊसमध्ये बैठक : पाचव्या दिवशीही बंद; लाखोंची उलाढाल ठप्प
गांधीनगर : गांधीनगरमधील वादग्रस्त जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविल्याने निर्माण झालेल्या वादामुळे सिंधी बांधवांनी सलग पाचव्या दिवशीही गांधीनगर बाजारपेठ बंद ठेवली. दरम्यान, याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, प्रा. शहाजी कांबळे व सिंधी बांधवांची दुपारी सर्किट हाऊसमध्ये बैठक झाली, पण ही चर्चा अंतिम निर्णयापर्यंत पोहोचली नाही.
या बैठकीदरम्यान अनेक पर्याय सुचविण्यात आले. त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या प्रतिनिधींनी गांधीनगरमध्ये पर्यायी जागा सुचवावी, जेणेकरून त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेबांचा पुतळा बसविता येईल. त्यावर पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे सुचविले. त्यानंतर बैठकीची सांगता झाली.
दरम्यान, सायंकाळी भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी गांधीनगर येथे येऊन व्यापारी व सिंधी बांधवांना शांततेचे आवाहन केले. तसेच शनिवारपर्यंत यावर तोडगा निघेल, असेही सांगितले. याप्रश्नी ठोस निर्णय न झाल्याने व्यापाऱ्यांनी ‘बेमुदत बंद’ची हाक कायम ठेवली आहे.
मुळची महाराष्ट्र शासनाची ही आरक्षित जागा आहे. त्या जागेवर ‘सार्वजनिक शौचालयासाठी आरक्षित’ असा उल्लेख आहे. तरीही याच जागेवर दुर्गामातेचे मंदिर अनधिकृत उभा केले आहे. त्यावेळी इतका विरोध झाला नाही, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी का विरोध होतो, अशी भावना ‘लोकमत’शी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली. सिंधी बांधव, कोल्हापूर जिल्हा भाजपचे सरचिटणीस श्रीचंद्र पंजवाणी म्हणाले, ही जागा महामानवाच्या स्मारकासाठी योग्य नाही. याठिकाणी भाजी मार्केट तसेच फळांच्या गाड्या उभ्या असतात. कोणीही कचरा याठिकाणी टाकल्यास ते योग्य ठरणार नाही. त्यामुळे आमचा विरोध पुतळा उभारणीला नाही, तर तो वादग्रस्त जागेवर उभारणीला आहे. रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यानी सांगितले, वातावरण दूषित न करता सामाजिक सलोखा राहण्यासाठी दैनंदिन व्यवहार सुरू ठेवून न्यायालयाच्या आदेशाची वाट पहावी.
डॉ. आंबेडकरांच्या पुतळ््यास विरोध नको
गांधीनगर येथे बसविण्यात आलेल्या डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास होणारा विरोध सिंधी समाजाने त्वरित थांबवावा़ गांधीनगरमधील काही स्वार्थी वृत्तीच्या लोकांनी डॉ़ आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसरातील जागा मोक्याची असल्यामुळे वाद निर्माण करून ही जागा हडपण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत़ हा प्रयत्न आंबेडकरी कार्यकर्ते यशस्वी होऊ देणार नाहीत, असा इशारा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या (आठवले) बांधकाम कामगार आघाडीच्या बैठकीत देण्यात आला़ अध्यक्षस्थानी गुणवंत नागटिळे होते़