गांधीनगरातील कामगार आर्थिक विवंचनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:16 AM2021-06-29T04:16:23+5:302021-06-29T04:16:23+5:30

बाबासाहेब नेर्ले गांधीनगर : गेल्या अडीच महिन्यांपासून लाॅकडाऊनच्या विळख्यात सापडलेल्या गांधीनगर बाजारपेठेतील दुकाने बंद असल्याने कामगार वर्गावर उपासमारीची कुऱ्हाड ...

Gandhinagar workers in financial straits | गांधीनगरातील कामगार आर्थिक विवंचनेत

गांधीनगरातील कामगार आर्थिक विवंचनेत

Next

बाबासाहेब नेर्ले

गांधीनगर : गेल्या अडीच महिन्यांपासून लाॅकडाऊनच्या विळख्यात सापडलेल्या गांधीनगर बाजारपेठेतील दुकाने बंद असल्याने कामगार वर्गावर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली असून, बेरोजगारीमुळे अनेक कुटुंबीयांना हालाखीचे दिवस आले आहेत. त्यामुळे येथील कामगार ‘कोणी काम देता का काम’ अशी आर्त विनवणी करत आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या बाजारपेठेत होलसेल व रेटेलची अडीच ते तीन हजार दुकाने आहेत. त्यामध्ये पंधरा ते वीस हजार कामगार काम करत आहेत. कोरोना महामारीच्या संसर्गामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून ही व्यापारी पेठ बंद आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. येथील व्यावसायिकांना दुकाने बंद असल्यामुळे खर्चाचा ताळमेळ घालताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दुकान गाळ्यांचे भरमसाठ भाडे, बँकांचे कर्ज काढून सुरू केलेला व्यवसाय, त्यातच शासनाचे विविध कर यामुळे मेटाकुटीला आलेला व्यावसायिक हतबल झाला आहे. व्यवसायच बंद झाल्याने अनेक कामगारांना कामावरून कमी केले जात आहे. त्यामुळे अनेक कामगारांना आपल्या कामाला मुकण्याची वेळ आलेली आहे. हातावरील पोट असणाऱ्या कामगार वर्गावर या लॉकडाऊनचा विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे कुटुंबीयांना जगवायचे कसे? असा प्रश्न येथील कामगार वर्गावर आ-वासून उभा आहे.

गांधीनगरमधील काही व्यापाऱ्यांनी आपला कामगार जगला पाहिजे म्हणून अर्धा पगार देण्याची तजवीज ठेवली असली, तरीही काही व्यापाऱ्यांनी कामगारांना व्यवसायच ठप्प झाल्याने कामावरून कमी केले आहे. कामाला मुकलेला कामगार दुसरीकडे काम शोधण्याच्या प्रयत्नात आहे; पण व्यवसायच बंद असल्याने दुसरीकडेही काम मिळणे मुश्कील झाले आहे.

त्यामुळे प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढून व्यापार पूर्ववत सुरू करून येथील कामगारांवर व कुटुंबीयांवर आलेली उपासमारीची वेळ दूर करावी, अशी मागणी कामगार वर्गातून जोर धरू लागली आहे.

चौकट : येथील काही व्यापाऱ्यांनी कामगारांच्या कुटुंबीयांचा विचार करून त्याला गरजेपुरता पगार देत आहेत. काहींनी आर्थिक अडचणी समोर ठेवून कामगार संख्या कमी केली आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काम बंद झाल्याने अनेक कामगार आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी कर्जबाजारी झाले आहेत. त्यातच खासगी सावकार वसुलीचा तगादा लावत आहेत. त्यामुळे कामगार वर्गावर अनेक अडचणींची कुऱ्हाड कोसळली आहे.

Web Title: Gandhinagar workers in financial straits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.