आठवडाभर आधीच श्रीगणेशा, कोल्हापुरात मंडळाच्या सोयीने मिरवणुका 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 05:09 PM2024-09-03T17:09:40+5:302024-09-03T17:12:10+5:30

अनंत चतुर्दशीलाच मिरवणुका काढण्याच्या पोलिसांनी केलेल्या आवाहनाला फाटा

Ganesh Arrival Procession by Public Ganesh Mandals in Kolhapur | आठवडाभर आधीच श्रीगणेशा, कोल्हापुरात मंडळाच्या सोयीने मिरवणुका 

आठवडाभर आधीच श्रीगणेशा, कोल्हापुरात मंडळाच्या सोयीने मिरवणुका 

कोल्हापूर : खरेतर वर्षभर गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वांना ओढ लागून राहिलेली असते. कोल्हापुरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळे गणेश आगमन आणि विसर्जनासाठी सोयीनुसार मिरवणुका काढतात. श्रीगणेश चतुर्थी ७ सप्टेंबरला आहे. मात्र, आठवडाभर आधीच शहरातील मोठ्या गणेश मंडळांनी दणक्यात आगमन सोहळ्याच्या मिरवणुका सुरू केल्या आहेत. पहिल्याच दिवशी मूर्ती भाविकांना खुली व्हावी, हा यामागचा खरा हेतू आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव सोहळा जोषपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. तिथी, मुहूर्त, प्रमाण वेळा पाहून आगमन सोहळा, प्रतिष्ठापना केली जाते. मात्र, यंदा सार्वजनिक मंडळांनी याचे भान ठेवलेले दिसत नाही. गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीलाच मिरवणुका काढण्याचे आवाहन पोलिसांनी केले असले तरी त्याला फाटा दिला जात आहे. 

यंदा २१ फुटी अनेक गणेशमूर्ती मुंबईहून मागवण्यात आल्यामुळे त्यांचा आगमन सोहळा मंडळांकडून थाटात होत आहे. मुंबईत लालबाग येथे तयार झालेल्या रंकाळवेशचा २१ फुटी लालबागचा राजा सर्वांत प्रथम कोल्हापुरात दाखल झाला. 

गणेश चतुर्थीलाच दर्शन खुले करण्याचे नियोजन

अनेक मोठ्या गणेश मंडळांना त्यांच्या गणेशमूर्ती मंडपात विराजमान झाल्यानंतर सजावट, देखावे करण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे देखावे खुले करण्यासाठी गणेश चतुर्थीनंतर दोन ते तीन दिवस जातात. ते टाळण्यासाठी यंदा आठवडाभर आधीच मूर्ती मंडपात विराजमान केली तर देखावे आणि सजावट करणे सोयीचे जाते आणि चतुर्थीलाच देखावे सर्वांसाठी खुले करता येतात, म्हणून हे नियाेजन मंडळांनी केले आहे.

ढोलपथक, लेसर शोच्या तारखांनुसार मिरवणुका

मिरवणुकांसाठी ढाेल पथके, ध्वनियंत्रणा, लेसर शोची यंत्रणा एकाच दिवशी सर्वांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे सोयीच्या दिवशी मिरवणूक काढल्या जात असल्याचे कारण मंडळांकडून दिले आहे.

साउंड सिस्टमवर निर्बंध

साउंड सिस्टमवर निर्बंध असल्यामुळेही पारंपरिक वाद्यांसोबत ढोल-ताशा पथक, इतर ध्वनियंत्रणा, लेसर शो यासारख्या यंत्रणांवर मंडळांनी भर दिला आहे.

स्वत:चे अस्तित्व दाखवण्याची संधी

अनेक मंडळांना गर्दीत आपल्या गणेशमूर्तीचे आगमन सोहळा साजरा करायचा नसतो. आपल्याच मंडळाची मूर्ती कशी चांगली आणि आमचेच मंडळ कसे चांगले याकडे लक्ष वेधण्याची आणि स्वत:चे अस्तित्व दाखवण्याची ही संधी मंडळ साधून घेत आहेत.

पाटाकडील तालीम मंडळाची गणेशमूर्ती जेथे विराजमान होते, ती जागा चिंचोळी आहे. तेथे सजावट लवकर करणे सोयीचे व्हावे, तसेच ३५ ते ४० देणगीदारांचा योग्य सन्मान व्हावा, भक्तांना पहिल्या दिवसांपासूनच दर्शन मिळावे, कार्यकर्त्यांना घरचा व गल्लीतल्या छोट्या मंडळांच्या गणपती उत्सवात सहभागी होता यावे यासाठी तालमीचा गणपती लवकर आणण्याचे ठरवले. -प्रसाद अनिल देवणे, अध्यक्ष, पाटाकडील तालीम मंडळ, गणेशोत्सव समिती.

तुकाराम माळी तालमीला यंदा दीडशे वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने गणपतीसाठी ३० बाय ६० मंडप घातला आहे. दहा दिवसांच्या विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. त्यासाठी तसेच पहिल्या दिवसांपासून दर्शन मिळावे यासाठी गणपती आगमन सोहळा लवकर केला. -प्रफुल्ल मेथे, अध्यक्ष, तुकाराम माळी तालीम मंडळ.

Web Title: Ganesh Arrival Procession by Public Ganesh Mandals in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.