गणेश आगमनादिवशी गडमुडशिंगीत खून, चौघांवर गुन्हा, तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 06:21 PM2019-09-03T18:21:48+5:302019-09-03T18:26:22+5:30
गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील मध्यवर्ती हुडा चौकात धारदार शस्त्राने व दगडाने ठेचून तरुणाचा खून करण्यात आला. ऋषिकेश उर्फ चेअरमन अशोक कांबळे (वय २२, रा. गडमुडशिंगी) असे मृताचे नाव आहे. सोमवारी गणेश आगमनादिवशी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.
गांधीनगर : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील मध्यवर्ती हुडा चौकात धारदार शस्त्राने व दगडाने ठेचून तरुणाचा खून करण्यात आला. ऋषिकेश उर्फ चेअरमन अशोक कांबळे (वय २२, रा. गडमुडशिंगी) असे मृताचे नाव आहे. सोमवारी गणेश आगमनादिवशी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी गांधीनगर पोलीसांनी वडील दोन मुलांसह चौघांना मंगळवारी अटक केली. संशयित आरोपी दिलीप यल्लपा कांबळे (वय ५५), त्याची मुले पद्मजीत (२४), पंकज (२१), नातेवाईक रोहित मोहन कांबळे (४२, सर्व रा. गडमुडशिंगी) अशी त्यांची नावे आहेत.
संशयितांच्या घराशेजारी ऋषिकेश कांबळे हा मंडळाचा गणपती बसविणार होता. त्याला विरोध केला होता. परंतु ऋषिकेशने मी गणपती याठिकाणीच बसविणार अशी भूमिका घेतल्याने त्यांच्यात वादावादी होवून संशयितांनी त्याचा चाकु व दगडाने ठेचून खून केला.
गणरायाचा आगमानादिवशीच ही घटना घडल्याने गावात तणाव पसरला. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणाखाली आनली. करवीचे पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी घटनास्थळी भेट देवून मृताच्या नातेवाईकांना शांत राहण्याचे आवाहन करीत आरोपींना तत्काळ अटक करण्याची ग्वाही दिली.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, ऋषीकेश कांबळे व संशयित पंकज कांबळे हे मित्र होते. मे महिन्यामध्ये पंकजचा भाऊ पद्मजीतचे लग्न झाले. या लग्न कार्यक्रमात एक हजार रुपये व दोन मोबाईल चोरीला गेले होते. त्याचा संशय ऋषीकेशवर घेतला होता. त्यातून दोन्ही कुटूंबात वादावादी झाली होती. संशयितांच्या मनामध्ये तो राग होता. सोमवारी गावात गणेश आगमनामुळे उत्साहाचे वातावरण होते.
ऋषीकेशच्या मित्रांनी गल्लीमध्ये गणपती बसविण्याची तयारी केली होती. संशयितांच्या घराशेजारी गणपती बसविणार असल्याने त्यांनी विरोध केला. परंतु ऋषीकेशने याच ठिकाणी गणपती बसविण्याचा निर्णय घेतला. रात्री नऊच्या सुमारास गणेशाची प्रतिष्ठापना झालेनंतर संशयितांनी ऋषीकेशला अडवून जाब विचारला.
यावेळी झालेल्या वादावादीतून पंकजने चाकुने छाती व पोटावर वार केले. तर पद्मजीतने डोक्यात दगड घातला. गल्लीमध्ये हल्ला झाल्याने काही नागरिकांनी पुढे जावून संशयितांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तुम्ही कोणी मध्ये पडू नका, आता याला ठेवतच नाही असे म्हणून बापलेकांनी दगड, विटांनी ठेचून गंभीर जखमी केले.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ऋषीकेशला गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन सीपीआरमध्ये दाखल केले. याठिकाणी उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच गडमुडशिंगी गावात तणाव पसरला.
गांधीनगरचे सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी तत्काळ संशयितांना अटक केली. संशयितांच्या घरातील अन्य लोक भितीने नातेवाईकांकडून घराला कुलूप लावून गेले आहेत. पुन्हा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मृत ऋषीकेशचा भाऊ विनायक कांबळे याने गांधीनगर पोलीस ठाण्यात संशयितांच्या विरोधात फिर्याद दिली.
मृत ऋषीकेशच्या घरची पार्श्वभूमी
ऋषीकेशचे वडील माळी कामगार होते. त्यांचे काही वर्षापूर्वी निधन झाले. आई गडमुडशिंगी ग्रामपंचायतीकडे सफाई कामगार म्हणून काम करते. थोरला भाऊ विनायक हा कोल्हापुरात खासगी नोकरी करतो. ऋषीकेश हा सातवी नापास होता. तो सेंट्रींगची कामे करीत होता.