कोल्हापूरचा गणेशोत्सव
By admin | Published: September 15, 2015 01:04 AM2015-09-15T01:04:37+5:302015-09-15T01:04:37+5:30
अभिनव कल्पना : मूर्तींपासून देखाव्यांची माहिती
संतोष मिठारी / कोल्हापूर
पारंपरिक व आधुनिकतेचा संगम असलेल्या कोल्हापूरच्या गणेशोत्सवाची माहिती वेबसाईट आणि फेसबुक पेजच्या पुढे जाऊन थेट ‘मोबाईल अॅप’द्वारे यावर्षी मिळणार आहे. अभियांत्रिकीच्या चार विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे त्यासाठी ‘गणेशोत्सव २०१५’ हे मोबाईल अॅप्लिकेशन तयार केले आहे. त्यात शहरासह जिल्ह्यातील विविध मंडळांची गणेशमूर्ती, देखावे, त्यांच्याकडून राबविल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती मिळणार आहे.
संजय घोडावत ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटचा वैभव वाडकर व गिरीष पटेल, धनंजय महाडिक ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशनचा नंदकुमार माने आणि भारती विद्यापीठ कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगचा अल्तमेश काझी या विद्यार्थ्यांनी ‘गणेशोत्सव २०१५’ अॅपची निर्मिती केली आहे. अवघ्या वीस दिवसांत त्यांनी अॅप साकारले आहे. त्यात गणेश मंडळे तसेच वापरकर्ते (युजर) यांच्या नोंदणीची सुविधा आहे. नोंदणी केल्यानंतर मंडळांना आपल्या गणेशमूर्तीची छायाचित्रे, मंडळाच्या उपक्रमांची तसेच देखाव्याची माहिती नोंदविता येणार आहे. आतापर्यंत २५ हून अधिक मंडळांनी अॅप्लिकेशनवर माहितीची नोंद केली आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळे, त्यांच्या कार्यक्रमांची तसेच मानाच्या गणपतींची माहिती मिळणार आहे. शिवाय पोलीस, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा अशा अत्यावश्यक सुविधांचे क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. मंडळांच्या उत्सव काळातील कार्यक्रमांची ‘इव्हेंट’या सदरात नोंद करून ती पाठविल्यास एकाचवेळी सर्व वापरकर्त्यांना ती नोटिफिकेशनसह समजणार आहे. बी. ई. कॉम्प्युटर सायन्स व सिव्हील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी साकारलेले हे अॅप कार्यकर्ते आणि गणेशभक्तांसाठी उपयुक्त ठरणार आहे.