गणेशमूर्तींसाठी कुंभारवाड्यात लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:46 AM2018-07-09T00:46:43+5:302018-07-09T00:46:46+5:30
कोल्हापूर : करोडो भक्तांचे आराध्य दैवत श्री गणेशाच्या आगमनाला आता दोन महिने राहिल्याने कुंभार बांधवांचे हात आकर्षक गणेशमूर्ती साकारण्यात गुंतले आहेत. त्यामुळे शहरातील शाहूपुरी कुंभार गल्ली, बापट कॅम्प, पापाची तिकटी या कुंभार वसाहतींमध्ये घरोघरी गणेशमूर्ती बनविण्याची लगबग सुरू आहे.
गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा सण. कुटुंबातील लहानग्यांपासून ते आजी-आजोबांपर्यंतच्या भक्तांच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र, यावर्षी अधिक महिना आल्याने दरवर्षी आॅगस्टमध्ये येणारा गणेशोत्सव यंदा १३ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे कुंभारबांधवांना गणेशमूर्ती घडविण्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे. आता उत्सवाला दोन महिने राहिल्याने कुंभारबांधवांच्या घराघरांत वेगवेगळ्या स्वरूपांतील आकर्षक गणेशमूर्ती आकाराला येत आहेत. गंगावेश, पापाची तिकटी आणि शाहूपुरी कुंभार गल्लीत प्रत्येक घराच्या दारात गणेशमूर्तींसाठी मांडव उभारण्यात आले आहेत. मार्केट यार्डमध्ये अनेकजणांचे गाळे असल्याने तेथेही काम सुरू आहे.
सध्या तयार गणेशमूर्तींवर अखेरचा हात फिरविण्याचे काम सुरू आहे. घरगुती आणि मंडळांच्या गणेशमूर्तींचे कोरीव काम केले जात आहे; तर अनेक कुंभारांकडून कच्च्या गणेशमूर्ती परगावी पाठविल्या जात आहेत. मोजक्या घरांमध्ये मूर्तींचे रंगकाम सुरू झाले आहे.
पर्यावरणपूरक
मूर्तींना मागणी
नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी प्रबोधन झाल्याने गेल्या काही वर्षांत शाडूच्या आणि कागदाच्या लगद्याच्या मूर्तींना मागणी
वाढली आहे. घरगुतीसह मंडळांनीही पर्यावरणपूरक गणेशमूर्तींसाठी मूर्तिकारांकडे नावनोंदणी केली आहे. याशिवाय निसर्गमित्र, चेतना विकास मंदिर या संस्थांकडूनही इको-फ्रेंडली गणेशमूर्ती घडविल्या जात आहेत.
‘जी.एस.टी.’मुळे १८ टक्क्यांनी दरवाढ
गतवर्षी केंद्र शासनाने लागू केलेल्या जी.एस.टी.मुळे गणेशमूर्तींच्या दरातही वाढ झाली आहे. मूर्ती घडविण्यासाठी लागणारे प्लास्टर आॅफ पॅरिस, गबाळ आणि रंग या सगळ्यांचा मिळून जवळपास १८ टक्के जीएसटी जातो. त्यामुळे गणेशमूर्तींचेही दर १८ टक्क्यांनी वाढणार आहेत.