कोल्हापुरात यंदा गणेश मिरवणुका एकाच दिवशी, पोलिसांनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 04:05 PM2024-08-23T16:05:33+5:302024-08-23T16:07:02+5:30
वाहतूक कोंडीने शहर होते त्रस्त, पोलिसांवर वाढतो ताण
कोल्हापूर : गणेश आगमन आणि विसर्जनासाठी मंडळे सोयीनुसार मिरवणुका काढतात. आगमनाला तर चार-पाच दिवस शहरात कुठेना कुठे मिरवणूक सुरूच असते. मात्र, यामुळे शहरात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. असे प्रकार टाळण्यासाठी गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीलाच मिरवणुका काढण्याची परवानगी मंडळांना दिली जाणार आहे. इतर दिवशी विनापरवानगी कोणी मिरवणूक काढल्यास मंडळांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी दिला आहे.
गणेशोत्सव हा धार्मिक सण आहे. त्याचे पावित्र्य जपणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. तिथी, मुहूर्त, प्रमाण वेळा यानुसारच सण साजरे केले जातात. याचे भान ठेवून सार्वजनिक मंडळांनी गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीलाच मिरवणुका काढण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. गेल्यावर्षी शहरात अनेक मंडळांनी गणेश चतुर्थीपासून ते अगदी पाचव्या दिवसापर्यंत आगमन मिरवणुका सुरू ठेवल्या. ढोलताशे, ध्वनियंत्रणा, लेसर शो आणि विद्युत झगमगाट करून रस्ते अडवले.
परिणामी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्रास झाला. रुग्णालये, रुग्ण, ज्येष्ठ नागरिकांनाही रोजच्या मिरवणुकांचा त्रास झाला. एका मंडळाने तर महाद्वार रोडवरील मिरवणुकीत पुरेसा वेळ मिळत नसल्याचे कारण देत अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढून पोलिस यंत्रणा आणि नागरिकांना वेठीस धरले. असे प्रकार टाळण्यासाठी सर्व मंडळांनी आगमन आणि विसर्जन मिरवणूक एकाच दिवशी काढण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सर्व पोलिस ठाण्यांकडून मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन याबाबत सूचना दिल्या जात आहेत. मंडळांनी याचे काटेकोर पालन करावे, अन्यथा विनापरवानगी मिरवणुका काढणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
ध्वनियंत्रणांचे कारण नको
मिरवणुकांसाठी ढाल पथके, ध्वनियंत्रणा, लेसर शोची यंत्रणा एकाच दिवशी सर्वांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे सोयीच्या दिवशी मिरवणूक काढत असल्याचे कारण मंडळांकडून दिले जाते. मात्र, धार्मिक उत्सवात मुहूर्त आणि वेळेला महत्त्व असल्याने इतर वेळी मिरवणुका काढून चुकीचा पायंडा पाडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. एकाच परिसरातील दोन-तीन मंडळांनी एकत्र येऊन मिरवणूक काढण्याचा पर्याय पोलिसांनी सुचवला आहे. यातून वेळ आणि पैशांचाही बचत होऊ शकते.
गेल्यावर्षी तीन मंडळांवर गुन्हे
गेल्यावर्षी विनापरवानगी मिरवणूक काढल्याबद्दल जुना राजवाडा पोलिसांनी तीन मंडळांवर गुन्हे दाखल केले. यात उमा टॉकीज परिसरातील दोन आणि जुना बुधवार पेठेतील एका मंडळाचा समावेश आहे. त्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना अजून न्यायालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. अशी कारवाई टाळण्यासाठी मंडळांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.