Ganesh Visarjan 2018 : कोल्हापुरात 'लेसर शो’ ने मिरवणुकीला झळाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 08:10 PM2018-09-23T20:10:21+5:302018-09-23T21:39:48+5:30
सकाळी नऊ वाजल्यापासून भक्तीमय वातावरण आणि शांततेमध्ये सुरू असलेल्या कोल्हापुरातील सार्वजनिक गणेशउत्सव मिरवणुकीत रविवारी सायंकाळी सातनंतर उत्साहाला भरते आले. डोळे दिपविणारा लेसर शो आणि लाईट शो, विविध लोकनृत्यांनी मिरवणूक रंगली. गणेशभक्त आणि कोल्हापूरकरांच्या गर्दीने मिरवणूक मार्ग फुलून गेला.
कोल्हापूर : सकाळी नऊ वाजल्यापासून भक्तीमय वातावरण आणि शांततेमध्ये सुरू असलेल्या कोल्हापुरातील सार्वजनिक गणेशउत्सव मिरवणुकीत रविवारी सायंकाळी सातनंतर उत्साहाला भरते आले. डोळे दिपविणारा लेसर शो आणि लाईट शो, विविध लोकनृत्यांनी मिरवणूक रंगली. गणेशभक्त आणि कोल्हापूरकरांच्या गर्दीने मिरवणूक मार्ग फुलून गेला.
दुपारी अडीच ते साडेचारपर्यंत रेंगाळलेल्या विसर्जन मिरवणुकीचा वेग सायंकाळी पाचनंतर वाढू लागला. मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिरापर्यंत पाटाकडील तालीम मंडळ (पीटीएम), सुबराव गवळी तालीम, दिलबहार तालीम मंडळ आणि बालगोपाल तालीम मंडळ, तर ताराबाई रोडवरून उत्तरेश्वरपेठ वाघाची तालीम मंडळ, तटाकडील तालीम मंडळ, यु. के. बॉईज, हिंदवी, दयावान, क्रांती बॉईज, शिवाजी तालीम, चौपाटी ग्रुप ही मंडळे महाद्वार रोड ते पापाची तिकटी या मार्गावर दाखल होत राहिली.
यातील बहुतांश मंडळांनी रंगीबेरंगी लेसर शो, लाईट शो सादर केला. त्यामुळे मिरवणुक मार्ग झगमगून गेला. लेसर शो, लाईट शो असलेल्या मंडळांसमोर त्यांचे कार्यकर्ते मंडळाच्या नावाचा ध्वज घेऊन नृत्य करीत होते. खासबाग मैदान, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वाररोड, पापाची तिकटी, ताराबाई रोड, गंगावेशपर्यंतचा मार्ग गर्दीने फुलला होता. रात्री साडेसातनंतर या गर्दीमध्ये वाढत होत राहिली.
लक्षवेधक लोकनृत्य
या मिरवणुकीत शिवाजीपेठेतील तटाकडील तालीम मंडळाने चिपळूण येथील लोकनृत्य सहभागी केले. स्वतंत्र ट्रकवर कलाकार लोकनृत्य सादर करत होते. हे लोकनृत्य लक्षवेधक ठरले.