Ganesh Visarjan 2018 : पोलिसांच्या लाठीमारमध्ये ‘प्रॅक्टीस क्लब’ चे तीन कार्यकर्ते जखमी, मिरवणूक थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 08:25 PM2018-09-23T20:25:29+5:302018-09-23T20:43:07+5:30
पुढे जाण्याच्या कारणावरून मिरवणुकीत जोतिबा रोड कॉर्नर येथे प्रॅक्टीस क्लब या मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलिसांत बाचाबाची झाली. त्यात कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारल्याने पोलिसांनी रविवारी ७ च्या सुमारास लाठीमार केला. त्यात या मंडळाचे तीन कार्यकर्ते जखमी झाले. सौरभ हारूगले, नीरज ढोबळे, विनय क्षीरसागर अशी जखमी कार्यकर्त्यांची नावे आहेत. या प्रकारामुळे मिरवणूक थांबली.
कोल्हापूर : पुढे जाण्याच्या कारणावरून मिरवणुकीत जोतिबा रोड कॉर्नर येथे प्रॅक्टीस क्लब या मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलिसांत बाचाबाची झाली. त्यात कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारल्याने पोलिसांनी रविवारी ७ च्या सुमारास लाठीमार केला. त्यात या मंडळाचे तीन कार्यकर्ते जखमी झाले. सौरभ हारूगले, नीरज ढोबळे, विनय क्षीरसागर अशी जखमी कार्यकर्त्यांची नावे आहेत. या प्रकारामुळे मिरवणूक थांबली. कार्यकर्त्यांचा प्रक्षोभ आणि नेत्यांची मध्यस्थीनंतर पोलिसानी अखेर दिलगिरी व्यक्त केल्यानंतर मिरवणुकीस पुन्हा रात्री पावणे नऊच्या सुमारास प्रारंभ झाला.
मिरवणुकीत प्रॅक्टीस क्लब हे लेसर शोसह सहभागी झाले होते. बिनखांबी गणेश मंदिर ते जोतिबा रोड कॉर्नरपर्यंत येण्यास या मंडळाला थोडा अधिक वेळ लागला. त्यामुळे मिरवणूक मार्गावरील मंडळांमध्ये मोठे अंतर राहिले. श्री महालक्ष्मी भक्त मंडळाचा गणपती याच मार्गावरून मिरवणुकीत ७ वाजता सहभागी होणार होता, त्यामुळे प्रॅक्टिस क्लबला पुढे जाण्यास पोलिसानी सांगितले होते, तरीही प्रॅक्टिस क्लब तेथेच थांबून राहिले होते. त्यावर पोलिस आणि या क्लबच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली.
मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारला. कार्यकर्ते ऐकत नाहीत, समजून घेत नसल्याचे पाहून पोलिसांकडून लाठीमार सुरू झाला. त्यामुळे याठिकाणी पळापळ सुरू झाली. या लाठीमारमध्ये ‘प्रॅक्टीस’चे सौरभ, नीरज आणि विनय हे कार्यकर्ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले.
पोलिसांकडून झालेल्या या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारला. पोलिसांकडून लाठीमार झाल्याचे समजताच त्याठिकाणी आमदार राजेश क्षीरसागर दाखल झाले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे याठिकाणी आले. त्यांच्यामध्ये चर्चा सुरू राहिली. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मारल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. दिवसभर शांततेत सुरू असलेल्या मिरवणुकीला याप्रकारांमुळे गालबोट लागले.
वीजपुरवठा खंडित झाल्याने गोंधळ
या लाठीमार दरम्यान, जोतिबा रोड कॉर्नरवरील वीज खंडित झाल्याने गोंधळ उडाला. मिरवणूक पाहायला आलेल्या नागरिकांची पळापळ झाली.