Ganesh Visarjan : सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनही १०० टक्के पर्यावरणपूरक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 04:14 PM2020-09-02T16:14:48+5:302020-09-02T16:17:16+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेने यंदाच्या गणेशोत्सवामध्ये कौतुकास्पद कामगिरी केली. त्यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे घरगुतीप्रमाणेच सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनही १०० टक्के पर्यावरणपूरक झाले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव अशी दोन्ही कामे महापालिका व पोलीस प्रशासनाने करून दाखविली.
कोल्हापूर : महानगरपालिकेने यंदाच्या गणेशोत्सवामध्ये कौतुकास्पद कामगिरी केली. त्यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे घरगुतीप्रमाणेच सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनही १०० टक्के पर्यावरणपूरक झाले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव अशी दोन्ही कामे महापालिका व पोलीस प्रशासनाने करून दाखविली.
महापालिकेसमोर महापुराचे आणि कोरोना संसर्गाचे असे दुहेरी संकट आले. यामध्ये घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणेशोत्सव यांचीही जबाबदारी आली. या दरम्यान कोरोना संसर्ग न वाढण्याचे आव्हानही होते.
पोलीस प्रशासनासोबत नियोजन करण्यात आले. राज्य शासनाच्या आदेशानुसार पंचगंगा, रंकाळा यांसह अन्य ठिकाणी मूर्ती विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली. सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणे आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन होणे यासाठीही महापालिकेची सर्व यंत्रणा राबली.
प्रथमच महापालिका मंडळांच्या दारी
महापालिका, पोलीस प्रशासनाने सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन करताना विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून मूर्ती आणण्यासाठी मंडळांजवळच वाहने पाठवण्याची सुविधा दिली. यासाठी ६० टेम्पो उपलब्ध ठेवले होते. ४७५ पेक्षा जास्त गणेशमूर्ती थेट मंडळाच्या मंडपाजवळ वाहने आणून त्यांतून इराणी खणीत विसर्जित करण्यात आल्या.
इराणी खण येथे चोख नियोजन
महापालिकेच्या वतीने इराणी खण येथे गणेशमूर्ती विसर्जनासाठी चोख नियोजन केले. महापालिकेकडून मंडळाच्या इथून टेम्पोमधून आणलेल्या आणि मंडळ घेऊन येणाऱ्या मूर्ती येथे शिस्तबद्धरीत्या विसर्जित करण्यात आल्या. बोटी, तराफे, विद्युत रोषणाई यांची सुविधा दिली होती.
यांचे मोलाचे योगदान लाभले
महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश मस्कर, रावसाहेब चव्हाण, हर्षजित घाटगे, बाबूराव दबडे, अग्निशमन दलाचे मनीष रणभिसे, अतिक्रमण पथकप्रमुख पंडित पवार, विद्युत विभागाचे चेतन लायकर, वर्कशॉपचे चेतन शिंदे, गांधी मैदान विभाग कार्यालयातील सुनील बाईक, जनार्दन डफळे, विजय लोखंडे, अवधूत नेर्लीकर, अनिरुद्ध कोरडे यांचे मोलाचे योगदान लाभले.
महापालिका, पोलीस प्रशासन, सामाजिक संघटना यांनी हातात हात घालून केलेल्या कामामुळेच यंदाचा गणेशोत्सव १०० टक्के पर्यावरण पूरक झाला. शाहू रेस्क्यू फॉर्स, जीवनज्योती, व्हाईट आर्मी, महाराष्ट्र कमांडो फोर्स, टास्किंग फोर्स, आर. सी. पी., शहर वाहतूक शाखेचे पोलीस, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस, महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान, पोलीस मित्र अशा हजारो स्वयंसेवकांमुळेच हे शक्य होऊ शकले आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे प्रमोद जाधव, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, आश्पाक आजरेकर यांचेही काम कौतुकास पात्र आहे.
विसर्जनादिवशी महाद्वार रोडवर शुकशुकाट
प्रत्येक वर्षी गणपती विसर्जन मिरवणुकीत मिरजकर तिकटी, महाद्वार रोड ते पापाची तिकटी या मुख्य मार्गावर यायला मंडळाचे कार्यकर्ते आसुसलेले असतात. त्यातही दुपारी चार ते रात्री ११ ही वेळ साधण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यात अक्षरश: चढाओढ लागलेली असते.
मिरवणुकीच्या गोंगाटाने हा रस्ता जल्लोषाच्या परमोच्च बिंदूवर पोहोचलेला असायचा. यंदाचे वर्ष मात्र त्याला अपवाद राहिले. संपूर्ण दिवस तसेच मंगळवारची रात्र हा रस्ता अक्षरश: ओस पडला होता. रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता. चुकूनही कोणी या रस्त्याने गणपती विसर्जनास घेऊन जाऊ नये म्हणून पोलिसांनी बिनखांबी गणेश मंदिराजवळ रस्ता बंद केला होता. त्यामुळे नेहमीची वाहतूकही बंदच राहिली. ऐन विसर्जनादिवशीच या रस्त्याने कमालीचा सन्नाटा अनुभवला. महाद्वारलाही चुकल्या-चुकल्यासारखं वाटलं असेल.
कोल्हापूरच्या कारागिरांची कमाल
हैदराबाद येथे विसर्जनासाठी तयार केलेल्या ट्रॉलीची क्लिप नुकतीच व्हायरल झाली होती. ती पाहून येथील एक तंत्रज्ञ संजय अंजनेकर यांनी तशाच पद्धतीची ट्रॉली तयार करण्याचा मनोदय व्यक्त केला. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी त्यासाठीच्या खर्चाची जबाबदारी घेतली. अवघ्या तीन दिवसांत ट्रॉली तयार करून ती मंगळवारी (दि. १) इराणी खाणीवर बसविण्यात आली. या ट्रॉलीमुळे मूर्तींचे विसर्जन अतिशय पद्धतशीरपणे होत होते.
महालक्ष्मी भक्तचा गणपती महाद्वारात विसर्जित
अंबाबाई मंदिरातील गरुडमंडपात विराजमान होणाऱ्या महालक्ष्मी भक्त मंडळाचा मानाचा गणपती मंगळवारी सायंकाळी सात वाजता महाद्वार चौकातून पुढे आणून ताराबाई पार्क येथील भक्त निवासाच्या दारात उभारलेल्या कृत्रिम कुंडात विसर्जित करण्यात आला. यावेळी अध्यक्ष राजू मेवेकरी व पदाधिकारी उपस्थित होते.