विनापरवानगी गणेश विसर्जन मिरवणूक काढली, जुना बुधवार पेठ तालीम गणेश मंडळावर गुन्हा दाखल
By उद्धव गोडसे | Published: October 1, 2023 03:10 PM2023-10-01T15:10:05+5:302023-10-01T15:28:46+5:30
ट्रॅक्टर चालक, ध्वनियंत्रणा मालकांवरही गुन्हा
कोल्हापूर : जुना बुधवार पेठ तालीम गणेश मंडळाने अनंत चतुर्दशीनंतर दुस-या दिवशी शहरातून विनापरवानी विसर्जन मिरवणूक काढून वाहतुकीला अडथळा केला. पोलिसांचा आदेश धुडकावून विनापरवानगी मिरवणूक काढणे आणि पोलिसांशी हुज्जत घातल्याबद्दल मंडळाच्या पदाधिका-यांसह ट्रॅक्टर चालक, जनरेटरचे मालक, ध्वनियंत्रणेच्या मालकासह अनोळखी ४० ते ५० जणांवर लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी देतानाच पोलिसांनी नियम व अटींचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अनंत चतुर्दशीलाच मंडळांनी गणेश मूर्तींचे विसर्जन करणे आवश्यक होते. मात्र, जुना बुधवार पेठ तालीम गणेश मंडळाने पोलिसांचा आदेश धुडकावून शनिवारी शहरातून मिरवणूक काढत मूर्तीचे विसर्जन केले. मिरवणुकीसाठी पोलिसांची परवानगी घेतली नाही. वर्दळीच्या रस्त्यावर मिरवणूक काढून वाहतुकीला अडथळा केला. याबाबत जाब विचारणाऱ्या पोलिसांशी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हुज्जत घातली. मोठ्या आकाराचे स्ट्रक्चर, लेसर किरणांचा वापर आणि आवाज मर्यादेचे उल्लंघन करणारी ध्वनियंत्रणा लावल्याबद्दल लक्ष्मीपुरी पोलिसांनी मंडळाचे दहा पदाधिकारी, ट्रॅक्टरचालक, जनरेटरचे मालक, ध्वनियंत्रणेच्या मालकासह मंडळाचे समर्थक आणि अनोळखी ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल केला.
यांच्यावर गुन्हा दाखल
मंडळाचे पदाधिकारी केदार सुकुमार शिंदे, अक्षय संजय घाटगे, कल्पेश कृष्णात नाळे,जयशंकर धर्मेश नष्टे, तेजस ज्ञानेश्वर मोहिते, अजित मोहन मंडलिक, विनीत सुजित पाटील, ललित निशिकांत कराळ, प्रथमेश विजय लिमये, अमेय राकेश कांबळे (सर्व रा. जुना बुधवार पेठ, कोल्हापूर), अनोळखी दोन ट्रॅक्टरचालक, जनरेटरचे मालक सुतार बंधू, ध्वनियंत्रणेचे मालक सागर गवळी (रा. मंगळवार पेठ), मंडळाचे समर्थक उदय भोसले, सुशांत महाडिक, माजी नगरसेवक दिगंबर फराकटे यांच्यासह मिरवणुकीत सहभागी झालेल्या ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल झाला.