कोल्हापूरकरांचा नादखुळा! पंचगंगा नदीत एकाही मूर्तीचे केलं नाही विसर्जन, विधायकतेचा आदर्श राखला कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 01:02 PM2022-09-06T13:02:58+5:302022-09-06T13:32:27+5:30
एकाही भक्ताने नदीतील पाण्यात मूर्ती आणि निर्माल्य विसर्जन केले नाही. निर्माल्य, मूर्ती विसर्जन न झाल्याने वाहते पाणी नितळ, स्वच्छ राहिले.
कोल्हापूर : येथील पंचगंगा नदी परिसरातील संजयसिंह गायकवाड पुतळ्याजवळ सोमवारी सायंकाळी गणेशभक्तांनी स्वत:हूनच पर्यावरणपूरक गणेश आणि निर्माल्य विसर्जन केले. महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम कुंडात विसर्जन करत विधायकतेचा आदर्श कायम राखला. एकाही भक्ताने नदीतील पाण्यात मूर्ती आणि निर्माल्य विसर्जन केले नाही. निर्माल्य, मूर्ती विसर्जन न झाल्याने वाहते पाणी नितळ, स्वच्छ राहिले. विसर्जनासाठी सायंकाळी पाचनंतर भक्तांची मोठी गर्दी झाली. ढोल, ताशा आदी वाद्यांचा निनाद, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजराने घाट परिसर दुमदुमून गेला.
घरगुुती गणेशमूर्ती विसर्जन प्रभागनिहाय होण्यासाठी महापालिकेने यंदा चांगले नियोजन केले. त्यामुळे अनेक भक्तांनी प्रभागातील प्रमुख चौकांत महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम कुंडात मूर्ती आणि निर्माल्य विसर्जन करण्याला प्राधान्य दिले. जुना बुधवार पेठेसह त्या परिसरातील भक्तांनी पंचगंगा नदीवरील गायकवाड पुतळ्याजवळील कृत्रिम कुंडात मूर्ती विसर्जन करण्यासाठी गर्दी केली होती. चारचाकी, रिक्षा, ढकलगाड्यांतून मूर्ती विसर्जनासाठी येथे आणल्या. प्रत्येकमूर्तीसोबत कुटुंबातील आबालवृद्ध येत राहिले. सायंकाळी सहानंतर घाट परिसर भक्तांची प्रचंड गर्दी झाली होती. कृत्रिम कुंडात विसर्जन केल्यानंतर स्वयंसेवक आणि महापालिकेचे कर्मचारी मूर्ती एकत्र संकलित करत राहिले. संकलित केलेल्या मूर्ती आणि निर्माल्य तातडीने हलविण्याची व्यवस्था केली.
प्रदूषण रोखण्यासाठी
प्रदूषण रोखण्यासाठी पंचगंगा नदीतील पाण्यात मूर्ती आणि निर्माल्य विसर्जन कोणीही करू नये, यासाठी पोलीस, अग्निशमन दलाचे जवान, महापालिकेचे कर्मचारी तैनात होते. ते कुंडातच विसर्जन करण्याचे आवाहन करत होते. त्याला भक्तांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला.
न्यू पॅलेसमधील मूर्ती पालखीतून
न्यू पॅलेस येथे प्रतिष्ठापना केलेली गणेशमूर्ती विसर्जनासाठी सजविलेल्या पालखीतून पंचगंगा नदीवरील गायकवाड चौकात आणली. तिथे आरती करून कृत्रिम कुंडात मूर्ती विसर्जन करण्यात आली.
झिम्मा फुगडीचा फेर
गायकवाड चौकात अनेक महिलांनी झिम्मा फुगडीचा फेर धरला होता. गणेश आरती, प्रसाद म्हणून खोबरे, चिरमुऱ्यांच्या वाटपामुळे चौक परिसर भक्तिमय झाला होता.
घाटावर बंदी
गणेश विसर्जनासाठी प्रत्येक वर्षी घाटावर भक्तांची गर्दी होत होती पण यंदा पोलिसांनी घाटाकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेडस लावून बंद केले. घाटावर जाण्यास बंदी घातल्याने भक्तांची वर्दळ गायकवाड पुतळा ते तोरस्कर चौकापर्यंत राहिली. याउलट घाट परिसरात निरव शांतता राहिली.
कोटीतीर्थ तलावात विसर्जन नाही
कोटीतीर्थ तलावाच्या काठावर जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बॅरिकेडस लावून बंद केले होते. काठावर जाण्यास मज्जाव केला होता. याउलट शाहू मिल चौक आणि उद्यमनगर येथे तयार केलेल्या कृत्रिम कुंडात मूर्ती, निर्माल्य विसर्जन करण्यात आले. येथे झंवर उद्याेग समूहानेही विसर्जनाची व्यवस्था केली होती.