शिवाजी चौकात यंदा २१ इंच उंचीची गणेशमूर्ती, महागणपतीचे ऑनलाईन दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 05:29 PM2020-08-10T17:29:11+5:302020-08-10T17:31:07+5:30
शिवाजी चौकात यंदा २१ फुटी महागणपतीच्या मूर्तीऐवजी २१ इंच उंचीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. महागणपतीची मूर्ती ही शाहू सांस्कृतिक हॉल (मार्केट यार्ड) शेजारी तयार आहे.
कोल्हापूर : शिवाजी चौकात यंदा २१ फुटी महागणपतीच्या मूर्तीऐवजी २१ इंच उंचीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. महागणपतीची मूर्ती ही शाहू सांस्कृतिक हॉल (मार्केट यार्ड) शेजारी तयार आहे. त्या ठिकाणी शासनाच्या सर्व नियम, अटींचे पालन करून गणेशभक्तांसाठी केवळ मुखदर्शन आणि शिवाजी चौकात स्क्रीनवर अथवा ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शिवाजी चौक तरुण मंडळाचे अध्यक्ष व माजी महापौर नंदकुमार वळंजू यांनी रविवारी दिली.
या २१ फुटी महागणपतीच्या आगमनाची अथवा विसर्जनाची मिरवणूक काढली जाणार नाही. साधेपणाने हा उत्सव साजरा केला जाणार आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर प्रशासनाची पूर्वपरवानगी घेऊन या महागणपतीची मूर्ती विसर्जन करण्यात येईल.
तोपर्यंत गणेशोत्सवानंतर आहे त्याच ठिकाणी २१ फुटी मूर्ती मंडपामध्ये बंद करून ठेवण्यात येईल. शिवाजी चौकात २१ इंचांची पूजेच्या मूर्तीची अत्यंत साधेपणाने प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याची माहिती वळंजू यांनी दिली. प्रशासनाने घालून दिलेल्या नियम, अटींचे पालन केले जाईल, असे उपाध्यक्ष सुहास भेंडे यांनी सांगितले.