कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग ठरला, महाव्दार रोडवरील प्रवेशाबाबत झाला 'हा' निर्णय
By भीमगोंड देसाई | Published: September 6, 2022 02:56 PM2022-09-06T14:56:34+5:302022-09-06T15:55:37+5:30
जे मंडळ या पर्यायी मार्गाचा अवलंब करणार नाहीत त्यांना लकी ड्रॉ काढून महाव्दार रोडवर प्रवेश देण्यात येणार आहे
कोल्हापूर : पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन करुन काल, सोमवारी कोल्हापूरकरांनी नदीप्रदूषण टाळत मुर्तिदान चळवळीला बळ दिले. महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम कुंडात घरगुती गणेशमुर्ती विसर्जन करत विधायकतेचा आदर्श कायम राखला. यानंतर आता लक्ष लागून राहिले होते ते मंडळांच्या बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीकडे. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने आगमन मिरवणुकीत गणेशमंडळांनी बाप्पांची धुमधडाक्यात मिरवणूक काढत प्रतिष्ठापणा केली होती. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीसाठी गणेश मंडळाकडून जय्यत तयारी सुरु आहे. यावर प्रशासनाने मार्ग काढत गर्दी टाळण्याचा प्रयत्न केला आहे.
यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक पारंपरिक महाव्दारसह हॉकी स्टेडियम, उमा टाकीज ते पापाची तिकटी या तीन मार्गावरून निघेल. महाव्दार सोडून पर्यायी दोन मार्गाने जाण्यास शहरातील बहुतांशी मंडळांनी मान्य केले आहे. जे मंडळ जाणार नाहीत, त्यांच्यामधून लकी ड्रॉच्या माध्यमातून चिठ्या काढून महाव्दार रोडवर प्रवेश दिला जाईल. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेवून शहरातील प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय याचे नियोजन केले जाईल, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी मंगळवारी दिली. विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनासाठी शाहू स्मारक भवनात आयोजित गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
पारंपरिक विसर्जन मिरवणुकीचा मार्ग असा : खासबाग मैदान, मिरजकर तिकटी, बिनखांबी, महाव्दार रोड, पापाची तिकटी, गंगावेस, रंकाळा टॉवर, क्रशरचौक
पर्यायी दोन मार्ग असे
- सुभाष रोडवरील सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, गोखले कॉलेज, हॉकी स्टेडियम, संभाजीनगर चौक, क्रशर चौक, इराणी खण.
- उमा टॉकीज, काॅमर्स कॉलेज, बिंदू चौक, शिवाजी चौक, पापाची तिकटी, गंगावेस, रंकाळा टॉवर
लकी ड्रॉच्या माध्यमातून महाव्दार रोडवर प्रवेश
जे मंडळ या पर्यायी मार्गाचा अवलंब करणार नाहीत त्यांना लकी ड्रॉ काढून महाव्दार रोडवर प्रवेश देण्यात येणार आहे. चिठ्या काढून या मंडळांना महाव्दार रोडवर प्रवेश दिला जाणार आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेवून शहरातील प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय याचे नियोजन केले जाईल.