गणेशमूर्ती, निर्माल्य दानाचा ‘कोल्हापुरी पॅटर्न’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 03:40 AM2020-08-21T03:40:34+5:302020-08-21T03:41:11+5:30
त्यापासून खत निर्मिती केली जाते. गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेली ही चळवळ आता कोल्हापूरकरांची उत्सव साजरा करण्याची पद्धती बनली आहे.
कोल्हापूर : वाजत-गाजत आलेल्या गणपती बाप्पांचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करताना पुरोगामी चळवळीचा वारसा लाभलेल्या कोल्हापुरात ३ लाखांवर गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन केले जाते. तर शंभर टक्के निर्माल्य दान केले जाते. त्यापासून खत निर्मिती केली जाते. गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेली ही चळवळ आता कोल्हापूरकरांची उत्सव साजरा करण्याची पद्धती बनली आहे.
कोल्हापूरला राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक, सांस्कृतिक, पुरोगामी विचारांचा वारसा लाभला आहे. जे-जे चांगलं ते अंगीकारत कोल्हापूरकरांनी नवा आदर्श राज्याला दिला. त्याचाच एक भाग म्हणजे पर्यावरणपूरक आणि विधायक गणेशोत्सव आहे.
>नागपूर । तलावात विसर्जनाला बंदी
पर्यावरण संवर्धनाचा विचार करता शहरातील तलावात विसर्जनाला बंदी घालण्यात आली आहे. महापालिकेच्या १० झोन क्षेत्रात २५० कृत्रिम तलावांची व्यवस्था केली जाणार आहे; सोबतच येथे निर्माल्य संकलन केले जाईल, अशी माहिती मनपा उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली.
>अकोला । वºहाडात घरीच विसर्जन
अकोलेकरांनी गणेश मूर्तींचे शक्यतोवर घरीच विसर्जन करण्याचे आवाहन महापौर अर्चना मसने यांनी केले आहे. काही ठिकाणी गणेश घाट निर्माण केले जातील. वाशिम व बुलडाण्यात घरोघरीच गणेश विसर्जन करावे, यावर भर दिला जाणार आहे.
>अहमदनगर। पालिकेची वाहने सज्ज
विसर्जनाच्या दिवशी गणेश मूर्ती घेण्यासाठी महापालिकेची वाहने तैनात असतील. या वाहनात मूर्ती विसर्जनासाठी नागरिकांनी द्यायची आहे. या वाहनातून सर्व मूर्ती तलावात विसर्जित केल्या जाणार आहेत. पर्यायी व्यवस्था म्हणून प्रत्येक प्रभागातही विसर्जन कुंड तयार करणार आहे.
>कोल्हापूर । पूरग्रस्तांना मदतीचा हात
कोल्हापूर शहरसह जिल्ह्यात
सात हजारांवर गणेश मंडळे आहेत. गेल्यावर्षी गणेशोत्सवाआधी कोल्हापुरात महापूर आला आणि होत्याचं नव्हतं झालं. मंडळांनी एक रुपयाचीही वर्गणी न घेता साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला. तसेच स्वखर्चातून पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्यांपासून ते त्यांचे घर उभारून देण्यापर्यंतची मदत केली.
>औरंगाबाद । विहिरींची सफाई लवकरच पूर्ण
शहरात दरवर्षी ११ ठिकाणच्या विहिरींमध्ये श्री गणेश विर्सजन व्यवस्था असते. महापालिकेने या विहिरींची सफाई तसेच त्या ठिकाणी मुरुम टाकून रस्ता तयार करणे, लाकडांचे बॅरिगेट्स लावण्यासह इतर कामांच्या निविदा मागविल्या. सर्व विहिरींच्या सफाईचे काम ४४ लाख रुपयांमध्ये देण्यात आले असून ते पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.
>नाशिक। नैसर्गिक जलस्रोतांपेक्षा कृत्रिम कुंडांवर यंदाही भर
नाशिक महापालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही नैसर्गिक जलस्रोतांपेक्षा कृत्रिम कुंडांवर अधिक भर दिला आहे. नाशिक शहरातील गोदावरी, नंदिनी, वालदेवी या तीन नद्यांवरील ३२ ठिकाणी विसर्जन स्थळे अधिकृत असल्याचे घोषित करण्यात आले आहे. मात्र त्याचबरोबर विविध प्रभागांमध्ये ३५ कृत्रिम कुंड तयार करण्यात येणार आहेत. तसेच विसर्जित मूर्ती दानाचा उपक्रम राबवून नद्या प्रदूषणविरहित ठेवण्यावर भर देण्यात येणार आहे.