Ganeshotsav : कोल्हापूर : पारंपरिक वाद्यांचा वापर करणाऱ्या मंडळांचा गौरव : अभिनव देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 11:23 AM2018-08-18T11:23:04+5:302018-08-18T11:28:40+5:30

यंदाच्या गणेशोत्सवात स्वागत आणि विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करणाºया सार्वजनिक मंडळांचा पोलीस दलाच्या वतीने विशेष गौरव केला जाणार आहे. त्यातूनही पोलिसांचे आदेश झिडकारून जे डॉल्बी लावतील, त्यांच्यावर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Ganeshotsav: Kolhapur: The glory of the circles using traditional instruments: Abhinav Deshmukh | Ganeshotsav : कोल्हापूर : पारंपरिक वाद्यांचा वापर करणाऱ्या मंडळांचा गौरव : अभिनव देशमुख

Ganeshotsav : कोल्हापूर : पारंपरिक वाद्यांचा वापर करणाऱ्या मंडळांचा गौरव : अभिनव देशमुख

googlenewsNext
ठळक मुद्दे पारंपरिक वाद्यांचा वापर करणाऱ्या मंडळांचा गौरव : अभिनव देशमुखयंदाही डॉल्बीमुक्त गणेशोत्सव : मंडळांच्या कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

एकनाथ पाटील

कोल्हापूर : यंदाच्या गणेशोत्सवात स्वागत आणि विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करणाºया सार्वजनिक मंडळांचा पोलीस दलाच्या वतीने विशेष गौरव केला जाणार आहे. त्यातूनही पोलिसांचे आदेश झिडकारून जे डॉल्बी लावतील, त्यांच्यावर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

गणेशोत्सव अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. गेल्या पाच वर्षांपासून ‘डॉल्बीमुक्त गणेशोत्सव’ साजरा केला जात आहे. गणेशोत्सवानंतर जिल्ह्यात होणाऱ्या सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांमध्ये डॉल्बीवर निर्बंध घालण्यात आले. यंदाचा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, जिल्ह्यात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या निरीक्षकांना सार्वजनिक मंडळांच्या प्रबोधनावर भर देण्याबरोबरच मंडळांना कायदेशीर नोटिसा पाठवून डॉल्बीपासून रोखण्यासाठी प्रयत्न करा, असे आदेश दिले आहेत. मी स्वत: प्रत्येक पोलीस ठाण्यास भेट देऊन हद्दीतील मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे.


पोलीस प्रशासनाने २०११ मध्ये गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्यासाठी पावले उचलली. यंदाही कोल्हापूर, इचलकरंजीसह उपनगरातील प्रत्येक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वैयक्तिक बैठका घेत त्यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कायद्याच्या पलीकडे जाऊन ध्वनिक्षेपक यंत्रणेचा वापर केल्यास मानवी शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होतात, हे वैद्यकीयदृष्ट्या पटवून दिले जात आहे. यापूर्वी डॉल्बी लावणाऱ्या ७५ तरुण मंडळांच्या २२५ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे.

बहुतांश सार्वजनिक तरुण मंडळांमध्ये तरुणांचा सहभाग मोठा असतो. पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार डॉल्बीवर कारवाई झाल्यास त्यामध्ये पाच वर्षे कारावासाची शिक्षा व एक लाख रुपये दंड, अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात; त्यामुळे पासपोर्ट, शासकीय, निमशासकीय नोकरीस हजर होताना अडचणी निर्माण होऊन बहुसंख्य तरुणांच्या भविष्याचे नुकसान होऊ शकते. याबाबतची जनजागृती मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये करण्यात येत असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

मंडळांना आवाहन

गणेशोत्सवात स्वागत व विसर्जन मिरवणुकीमध्ये सार्वजनिक मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. कोल्हापूरच्या ऐतिहासिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे देखावे पुढे आणावेत. शिवकालीन मर्दानी खेळ, क्रीडा, लेझीम, ढोलताषे, पोवाडे, अशा पारंपरिक कलांचे मिरवणुकीत दर्शन घडावे, जेणेकरून प्रत्येक कुटुंब मिरवणूक पाहण्यासाठी घराबाहेर पडेल.

विशेषत: महिलांच्यात सुरक्षेची भावना तयार होईल. मिरवणुकीत पुढे-मागे घेण्यावरून वाद निर्माण होतात. अशावेळी सामंजस्याची भूमिका घेत मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पुढाकार घेणाºया प्रमुख कार्यकर्त्यांसह विधायक भूमिका पार पाडणाºया सार्वजनिक मंडळांचा विशेष गौरव पोलीस दलाच्या वतीने करण्यात येणार आहे.

डॉल्बीच्या दृश्य परिणामांबाबत प्रबोधन

कायद्याच्या पलीकडे जाऊन ध्वनिक्षेपक यंत्रणेचा वापर केल्यास मानवी शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होतात. त्यामध्ये वृद्ध नागरिक, लहान बालके, गर्भवती स्त्रिया, मानवी श्रवण यंत्रणा, रक्तदाब, हृदयरोग, अर्धांगवायू असे आजार होण्याचे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे; त्यामुळे यंदाही डॉल्बीविरहित गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सर्व मंडळांना पोलीस दलाच्या वतीने केले जात आहे. सोशल मीडियाद्वारेही त्याचे प्रबोधन केले जात आहे.

‘एक गाव एक गणपती’ गावांचा गौरव

जिल्ह्यामध्ये गटतट बाजूला ठेवून गावची ऐकी टिकविण्यासाठी ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबविणाऱ्या गावांचा विशेष गौरव केला जाईल. त्यांना विशेष प्रशस्तीपत्र दिले जाईल.

 

Web Title: Ganeshotsav: Kolhapur: The glory of the circles using traditional instruments: Abhinav Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.