Ganeshotsav : लगबग गणेशोत्सवाची : कोल्हापूरात मांडव उभारणीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 11:35 AM2018-08-29T11:35:19+5:302018-08-29T11:37:31+5:30
गेल्या वर्षभरापासून आपण ज्या लाडक्या गणरायांच्या आगमनाची वाट पाहतो आहोत, त्या बाप्पांच्या स्वागताला आता अवघे पंधरा दिवस उरले आहेत. यानिमित्त शहरात गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली असून, तरुण मंडळांच्या वतीने मांडवांची उभारणी केली जात आहे.
कोल्हापूर : गेल्या वर्षभरापासून आपण ज्या लाडक्या गणरायांच्या आगमनाची वाट पाहतो आहोत, त्या बाप्पांच्या स्वागताला आता अवघे पंधरा दिवस उरले आहेत. यानिमित्त शहरात गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली असून, तरुण मंडळांच्या वतीने मांडवांची उभारणी केली जात आहे.
सध्या श्रावण सुरू आहे. तो सरला की भाद्रपदमध्ये गणेशोत्सव सुरू होतो. यंदा १३ सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थी आहे. गणेशोत्सवाला आता काही दिवस उरल्याने एकीकडे श्रावणातील व्रतवैकल्ये, तर दुसरीकडे गणेशोत्सवाची प्राथमिक तयारी असे चित्र आहे. विशेषत: मंडळांकडून आता सार्वजनिक गणेशोत्सवासाठी लगबग सुरू आहे. शहरातील नामांकित तरुण मंडळांकडून मांडवांची उभारणी सुरू झाली आहे.
शिवाजी चौक तरुण मंडळाचा महागणपती, शाहूपुरीतील राधाकृष्ण तरुण मंडळ, उमा टॉकीज परिसरातील पूलगल्ली तालीम मंडळ यांच्यासह शहरातील अनेक मोठ्या मंडळांकडून मांडवांची उभारणी सुरू झाली आहे. राधाकृष्ण तरुण मंडळाचा देशासह जगभरातील मंदिरे, काल्पनिक मंदिरे साकारण्यात हातखंडा आहे.
या मंडळाचा देखावा गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी खुला होतो. त्यामुळे मंडळाच्या वतीने मांडवात देखावा साकारला जात आहे. शिवाजी चौकातील महागणपतीची मूर्तीही दुसऱ्याच दिवशी दर्शनासाठी खुली केली जाते; त्यामुळे येथेही भव्य मांडव उभारला जात आहे. याशिवाय कोल्हापूर शहरासह उपनगरातील मंडळांच्या वतीने गणेशोत्सवाची तयारी सुरू आहे.
वर्गणीचे संकलन
एकीकडे मांडव उभारणीची तयारी सुरू असली तर दुसरीकडे मंडळांचे कार्यकर्ते वर्गणीचे संकलन करीत आहेत. गणेशोत्सव समितीची निवड, मंडळाची पावती पुस्तिका तयार करणे, उत्सवातील कामाचे वाटप, देखाव्यांचे नियोजन, रेकॉर्डिंग, तालमी, देखाव्यासाठी लागणाऱ्या साहित्याची जोडणी, श्रींच्या पूजेसाठी वापरण्यात येणारे सोवळे, वस्त्र, हार, या ठेवणीतील वस्तूंची स्वच्छता अशी प्राथमिक कामे सध्या मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहेत.