Ganeshotsav : कोल्हापूर जिल्ह्यात ३०४ गावांत ‘एक गाव, एक गणपती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 01:15 PM2018-09-03T13:15:18+5:302018-09-03T13:20:37+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार करीत ३०४ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबविण्यात येत आहे. यंदाच्या गणेशोत्सवात ७ हजार १३० मंडळांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कोल्हापूर : जिल्ह्यात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार करीत ३०४ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबविण्यात येत आहे. यंदाच्या गणेशोत्सवात ७ हजार १३० मंडळांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गणेशोत्सव डॉल्बीविरहित करण्याची परंपरा गेल्या चार-पाच वर्षांपासून सुरू आहे. त्याला संपूर्ण जिल्ह्यातून भरघोस प्रतिसादही मिळत आहे. यंदाचाही गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने जनजागृती केली जात आहे.
जिल्ह्यातील गावागावांत सार्वजनिक मंडळांच्या बैठका घेऊन गणेशोत्सव शांततेत व डॉल्बीविरहित साजरा करण्याचे आवाहन केले जात आहे. त्याला मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही प्रतिसाद दिला असून, ३०४ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ व सुमारे १२०० गावांत ‘डॉल्बी मुक्त गणेशोत्सव’ साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
मंडळांनी सीसीटीव्हीसाठी पुढाकार घ्यावा
‘एक खिडकी योजने’च्या माध्यमातून गणेश मंडळांना एका छताखाली सर्व परवाने दिले जात आहेत. त्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, याची दक्षता घेतली आहे, देखावे व विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या मंडळांनी सीसीटीव्ही लावावेत; जेणेकरून या ठिकाणी येणाºया महिला, बालके सुरक्षित राहतील.
गणेशोत्सवात अनेक मंडळे गोरगरिबांना आर्थिक मदत, वह्या-पुस्तकांचे वाटप करीत असतात. विधायक कामाला हातभार लावणाऱ्या अशा मंडळांनी सीसीटीव्हीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले आहे.