गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 11:55 PM2017-08-12T23:55:07+5:302017-08-12T23:55:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणरायाच्या आगमनाला आता अवघे बारा दिवस शिल्लक राहिले आहेत; त्यामुळे शहरात उत्सवाच्या आगमनाचे पडघम वाजू लागले आहेत. देव घडविणाºया कुंभारवाड्यातील लगबग, ठिकठिकाणी गणेशमूर्तींचे मांडलेले स्टॉल्स, मंडळांची मांडव उभारणी, आकर्षक विद्युतमाळा, मखरे, मंदिरांच्या लहान कटआउटस्ची मांडणी या तयारीने वातावरणात उत्साहाचे रंग भरू लागले आहेत.
गणेशोत्सव म्हणजे साक्षात देवानेच आपल्या घरी येणे. गौरी-गणपतीच्या या पाच-सहा दिवसांत वर्षभरातील सगळे ताणतणाव, दु:ख, विवंचना विसरून प्रत्येकजण आनंदोत्सव साजरा करतो. यंदा गणेशोत्सव २५ तारखेपासून सुरू होत आहे. सणाला आता काहीच दिवस शिल्लक राहिल्याने शहराला उत्सवाचे वेध लागले आहेत. त्यामुळे घरोघरी उत्सवाच्या प्राथमिक तयारीची चर्चा रंगू लागली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात वेगळी कोणती आरास करायची, यावर चर्चा झडू लागल्या आहेत.
कुंभारवाड्यात रंगकामाला वेग
उत्सवाची तयारी सुरू होते ती गणेशमूर्ती ठरविण्यापासून. त्यामुळे कुंभार गल्लीत तयार झालेल्या आकर्षक गणेशमूर्ती भाविकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, अद्याप तयार नसलेल्या कच्च्या गणेशमूर्तींना रंगविण्याच्या कामाला वेग आहे. गंगावेश, पापाची तिकटी आणि शाहूपुरी कुंभार गल्ली येथील प्रत्येक घराबाहेर मंडप उभारून काम सुरू आहे. दारात मांडलेल्या तयार मूर्ती आणि रंगकाम सुरू असलेल्या मूर्ती मन आकर्षून घेतात.
ढोल-ताशा पथकांचा सराव
आजवर केवळ पुण्याची मक्तेदारी असलेल्या ढोल-ताशा वादनात कोल्हापूरनेही पाऊल ठेवले आहे. डॉल्बीला उत्तम आणि पारंपरिक पर्याय म्हणून गेल्या तीन-चार वर्षांपासून ढोल-ताशांची क्रेझ वाढली आहे. पुण्याच्या पद्धतीला कोल्हापुरी परंपरेचा तडका देत तयार झालेल्या या ढोल-ताशा पथकांकडून जोरदार सराव सुरू आहे. अगदी लहान मुलींपासून ते महाविद्यालयीत युवक-युवतीसुद्धा या सरावात गुंतल्या आहेत. याशिवाय बँड-बेंजो पथकांकडूनही वाद्यांवर गाण्यांचा सराव सुरू आहे.
मांडव उभारणी
दुसरीकडे, गणेश मंडळांकडून एकीकडे वर्गणी स्वीकारणे सुरू आहे. दुसरीकडे, ठरलेल्या जागेवर मांडव उभारणीचे काम सुरू झाले आहे. मंडळांकडून दरवर्षी उत्सव समिती ठरविली जाते. त्या समितीकडून यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा करायचा, यावर नवनव्या संकल्पनांचा विचार होत आहे. शहराच्या चौकाचौकांत मंडळांचे डिजिटल फ्लेक्स लागले आहेत.
मखर, कटआउट्स,
विद्युतरोषणाई
श्री गणेशाच्या सजावटीसाठी लागणारे मखर, मंदिराच्या आकारातील डिजिटल कटआउट्स, आणि आकर्षक विद्युतमाळा दुकानांबाहेर सजविण्यात येत आहेत. टेंबे रोडसह महाद्वार रोड, पापाची तिकटी या प्रमुख बाजारपेठांमध्ये या सजावटीच्या साहित्याची मांडणी सुरू झाली आहे.