गणेशवाडी - कागवाड सीमा मार्ग वाहतुकीसाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:27 AM2021-04-28T04:27:04+5:302021-04-28T04:27:04+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रशासनाने लाॅकडाऊन करून जिल्हा बंदी घातली आहे. या उलट कर्नाटक ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रशासनाने लाॅकडाऊन करून जिल्हा बंदी घातली आहे. या उलट कर्नाटक राज्याने कडक अंमलबजावणी करीत कर्नाटक व महाराष्ट्र राज्यांच्या सीमेवर असलेल्या गणेशवाडी- कागवाड मार्गावर खबरदारी घेत जे.सी.बी.ने खुदाई करून रस्ता बंद करून टाकला आहे. यामुळे या मार्गावरून महाराष्ट्र आणि कर्नाटकची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. याचा सर्वाधिक फटका गणेशवाडीतील शेतकऱ्यांना बसला आहे. कर्नाटक हद्दीतील कागवाड, शेडबाळ, लोकूर, शिरगुपी आदी गावाच्या हद्दीत असणाऱ्या शेतात जाणे बंद झाल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. याबाबत कर्नाटक आणि महाराष्ट्र प्रशासनाने तोडगा काढून चर मुजवून पोलीस बंदोबस्तात नाका लावा, अशी मागणी शेतकरी,ग्रामस्थ करीत आहेत.
फोटो - : कर्नाटक व महाराष्ट्र राज्यांच्या सीमेवर गणेशवाडी-कागवाड मार्गावर जेसीबीच्या साह्याने मारलेली चर.
( छाया - रमेश सुतार)