गणेशवाडी पाझर तलावाची दुरवस्था
By admin | Published: May 19, 2015 07:23 PM2015-05-19T19:23:13+5:302015-05-20T00:13:18+5:30
शासनाचे दुर्लक्ष : भरावातून होते पाणी गळती; लाभक्षेत्राला पाणी मिळत नाही
शिवराज लोंढे - सावरवाडी -लाभक्षेत्राला पाणीपुरवठा होण्याकडे झालेले दुर्लक्ष, पाणी साठविण्याची कमी क्षमता, भरावातून होणारी पाण्याची गळती, पाच वर्षांपासून राज्य शासनाचे तलावाच्या दुरुस्तीकडे झालेले दुर्लक्ष, शेतीस अपुरा होणारा पाणीपुरवठा, पिकांचे होणारे नुकसान या समस्यांत सापडलेल्या गणेशवाडी (ता. करवीर) येथील पाझर तलावाची अवस्था सध्या बिकट बनली आहे. शासकीय पातळीवर निधी अद्याप उपलब्ध नाही.
राज्य शासनाने १२ वर्षांपूर्वी गणेशवाडीत डोंगरी भागात या पाझर तलावाची निर्मिती केली. या तलावाची उंची १४.८७ मीटर आहे. तलावाचे लाभक्षेत्र २५ हेक्टर आहे.
तलावाची पाणी साठवण क्षमता कमी असल्यामुळे जानेवारी ते जूनपर्यंत पाण्याची कमतरता भासते. त्यातच आठ वर्षांपासून तलावाच्या मुख्य भरावातून गळती लागली आहे. त्यामुळे पाण्याचा पुरेसा साठा होत नाही. त्यासाठी या पाझर तलावाच्या सभोवार नव्याने खुदाई करून पाणी साठवणुकीची क्षमता वाढविणे गरजेचे आहे. तसे झाले तर परिसरातील शेकडो एकर शेती ओलिताखाली आणणे शक्य आहे.
या पाझर तलावात कपडे, जनावरे धुतली जातात. पाझर तलावाच्या परिसरात मृत जनावरे टाकली जातात. त्यामुळे तलावातील पाणी दूषित झाले आहे. तलाव परिसर दारू पिण्याचा अड्डा बनला आहे.
भविष्यात जादा पाणीपुरवठा होण्यासाठी या पाझर तलावाच्या दुरुस्तीसह रुंदीकरण करणे गरजेचे आहे. पावसाळ्यात तलावात पाणी साठते. परंतु, ठिकठिकाणी गळती लागल्यामुळे पाणी वाया जाते. मुख्य भराव्याच्या गळतीचे बांधकाम करण्यासाठी शासकीय निधी मिळत नाही. तो तातडीने मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
डोंगरी भागातील कोरडवाहू जमिनीला पाणी मिळणे गरजेचे आहे. पाण्याअभावी पिके वाळू लागतात. शासनाने पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी जादा निधी मंजूर करावा.
- सिंधुताई माने, सरपंच,
ग्रामपंचायत गणेशवाडी
गेल्या अनेक वर्षांपासून भरावातून गळती होते. पाझर तलावाच्या दुरुस्तीकडे शासनाचे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष झाले. त्यासाठी भरावाचे बांधकाम होणे गरजेचे आहे.
- दादासाहेब लाड, संचालक,
कुंभी-कासारी साखर कारखाना.