विवाह इच्छुक युवकांना हेरून लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीस अटक, तीन महिलांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 12:51 PM2021-12-14T12:51:40+5:302021-12-14T12:52:20+5:30
विवाह ठरविताना यापुर्वी झालेल्या तीन विवाहाची माहिती ही लपवून ठेवली.
राशिवडे : विवाह इच्छुक युवकांना हेरून लाखोंची फसवणूक करणाऱ्या इचलकरंजी येथील टोळीस राधानगरी पोलिसांनी आज अटक केली. यामध्ये तीन महिलांसह एका पुरुषाचा समावेश आहे. याबाबत राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली पैकी जोगमोडी वाडी येथील विक्रम केशव जोगम (वय २४) यांनी याबाबत राधानगरी पोलिस ठाण्यात तक्रार केली. या टोळीकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
याबाबत माहिती अशी की, विक्रम जोगम यांचा विवाह दि.२२ जून २०२१ रोजी म्हासुर्लीपैकी जोगमवाडी येथे वैशाली संजय शिंदे (वय३८, रा.चांदणी चौक तारदाळ ता. हातकणंगले) हिच्याशी झाला. यावेळी विवाह ठरविण्यासाठी संजय विठ्ठल शिंदे, फिरोज बाबु शेख, समिना फिरोज शेख (रा.शाहुनगर चंदुर सध्या रा.ठाकरे चौक जवाहरनगर इचलकरंजी) यांनी फिर्यादीकडून एक लाख पाच हजार रुपये घेतले.
हा विवाह ठरविताना यापुर्वी झालेल्या तीन विवाहाची माहिती ही लपवून ठेवली. तर विक्रम जोगम यांचेकडून घेतलेली रक्कम आपापसात वाटून घेतली. त्यानुसार संबधीतांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार चार आरोपींना इचलकरंजी येथुन राधानगरीचे पोलीस निरीक्षक आण्णासो कोळी, पो.कॉ. सुरेश मेटील यांनी ताब्यात घेत मुसक्या आवळल्या.
यासंदर्भात आणखीन कोणाची फसवणुक झाली असेल तर त्यांनी राधानगरी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक आप्पासो कोळी यांनी केले आहे.