Kolhapur Crime: पॉलिशच्या बहाण्याने दागिण्यावर डल्ला, परप्रांतीय टोळी जेरबंद; साडेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 07:20 PM2023-02-01T19:20:44+5:302023-02-01T19:30:19+5:30
सहा जणांच्या टोळीकडून पाच गुन्ह्यांची उकल
उद्धव गोडसे
कोल्हापूर: पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने महिलांची दिशाभूल करून दागिने लंपास करणा-या परप्रांतीय टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आज, बुधवारी (दि. १) अटक केली. सहा जणांच्या टोळीकडून पोलिसांनी पाच गुन्ह्यांची उकल करून सुमारे साडेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. अटकेतील सर्व संशयित बिहारमधील असून, त्यांच्यावर बिहारसह सातारा जिल्ह्यातही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी बुधवारी (दि. १) पत्रकार परिषदेत दिली.
सचेनकुमार योगेंद्र साह (वय ३८, मूळ रा. जदिया, ता. त्रिवेणगंज, जि. सुपोल, राज्य बिहार, सध्या रा. कागल), बोआ राजू बडई (२५, मूळ रा. परमपार्क, सारसा, सध्या रा. कागल), कुंदनकुमार जगदेव साह (२८, मूळ रा. जदिया, सध्या रा. कागल), आर्यन अजय गुप्ता (१९), धीरजकुमार परमानंद साह (३१, दोघे रा. जमुनिया, जि. भागलपूर) आणि भावेश परमानंद गुप्ता (३५, रा. गोविंदपूर, जि. खगडिया) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.
राधानगरी तालुक्यातील वाळवे येथे २० जानेवारी रोजी दोन भामट्यांनी दागिने पॉलिश करून देतो असे सांगून दहा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र लांबवले होते. या गुन्ह्याची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झाल्यानंतर पोलिसांकडून संशयित भामट्यांचा शोध सुरू होता. दरम्यान, सोने पॉलिशचे काम करणारे काही संशयित कागलमध्ये राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उपनिरीक्षक विनायक सपाटे आणि त्यांच्या पथकाला मिळाली.
त्यानुसार कागलमध्ये जाऊन टोळीचा म्होरक्या सचेनकुमार याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी याच्या इतर पाच साथीदारांनाही अटक केली. या टोळीकडून जिल्ह्यात पाच ठिकाणी केलेल्या गुन्ह्याची उकल झाली असून, पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील दागिने, मोबाईल, तीन दुचाकी असा सुमारे १३ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. यावेळी अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत, आदी उपस्थित होते.