कोल्हापुरातील सराफाला २८ लाखांना लुटले; गोवा, मुंबईत पैसे उडवले, टोळी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 05:43 PM2024-02-26T17:43:16+5:302024-02-26T17:44:54+5:30
मुद्देमाल जप्त, जुना राजवाडा पोलिसांची कारवाई; बीसीएचे शिक्षण घेतलेला रोहित केसरकर हा टोळीचा प्रमुख
कोल्हापूर : सराफांना होलसेल दागिने पुरविणारे व्यावसायिक दादा नामदेव मेटकरी (रा. चंबुखडी, कोल्हापूर) यांचा पाठलाग करून पाच ते सहा जणांच्या सराईत टोळीने त्यांच्याकडील २८ लाखांची रोकड हिसकावून लंपास केली होती. १४ फेब्रुवारीच्या रात्री देवकर पाणंद येथे घडलेल्या लूटमारीचा छडा लावण्यात जुना राजवाडा पोलिसांना यश आले.
सहा जणांच्या टोळीला अटक करून लुटीतील २४ लाखांची रोकड, दोन दुचाकी आणि पाच मोबाइल असा २८ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला, अशी माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी रविवारी (दि. २५) पत्रकार परिषदेत दिली.
टोळीप्रमुख रोहित नारायण केसरकर (वय २८, रा. बोंद्रे गल्ली, शिवाजी पेठ), रणजित मधुकर कोतेकर (वय ३५, रा. क्रांतिसिंह नाना पाटील नगर, कोल्हापूर), स्वप्निल सुकलाल ढाकरे (वय २६, रा. राजेंद्रनगर), सौरभ लक्ष्मण शिवशरण (वय २४, रा. राजेंद्रनगर), तुषार जयसिंग रसाळे (वय २८, रा. तस्ते गल्ली, मंगळवार पेठ), ओमकार विजय शिंदे (वय २९, रा. काळकाई गल्ली, शिवाजी पेठ) अशी अटकेतील सहा जणांची नावे आहेत. न्यायालयात हजर केले असता, त्यांना २७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली.
निरीक्षक झाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सराफ व्यावसायिक मेटकरी हे जिल्ह्यातील सराफांना होलसेल दागिने पुरविण्याचे काम करतात. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी कोल्हापूर शहरातील व्यापाऱ्यांकडून दागिन्यांचे पैसे जमा करून मित्रासोबत ते चंबुखडी येथील घरी निघाले होते. त्यावेळी देवकर पाणंदजवळ दोन दुचाकींवरून पाठलाग करीत आलेल्या चौघांनी मेटकरी यांना अडवले. धक्काबुक्की करीत त्यांच्याकडील २८ लाखांची रोकड असलेली बॅग घेऊन चोरटे पसार झाले.
याबाबत मेटकरी यांनी १७ फेब्रुवारीला जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गुजरी ते देवकर पाणंद मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून सहा संशयितांना अटक केली. पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलिस हवालदार परशुराम गुजरे, सागर डोंगरे, सतीश भांबरे, प्रशांत घोलप, अमर पाटील, प्रशांत पांडव, गजानन गुरव, संदीप माने, योगेश गोसावी, गौरव शिंदे, उत्तम गुजरे यांनी गुन्ह्याचा तपास केला.
रसाळे याच्याकडून मेटकरींचा पाठलाग
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, १४ फेब्रुवारीला दिवसभर संशयित तुषार रसाळे हा सराफ व्यावसायिक मेटकरी यांचा पाठलाग करीत असल्याचे दिसले. संशयावरून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर लूटमारीचा उलगडा झाला.
गोवा, मुंबईत उडवले लुटीतील पैसे
केसरकर याच्या टोळीने सराफाचे २८ लाख लुटल्यानंतर थेट गोवा गाठले. गोव्यात मौजमजा केल्यानंतर ते मुंबईला पोहोचले. तिथेही त्यांनी जिवाची मुंबई करीत पैसे खर्च केले, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीतून समोर आली.
सराईत टोळीचे कृत्य
बीसीएचे शिक्षण घेतलेला रोहित केसरकर हा टोळीचा प्रमुख आहे. त्याच्यासह रणजित कोतेकर आणि स्वप्निल ढाकरे यांच्यावर मारामारी, चोरी, दहशत माजवण्याचे गुन्हे दाखल आहेत. या टोळीकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.