दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड
By admin | Published: May 3, 2015 01:14 AM2015-05-03T01:14:40+5:302015-05-03T01:14:40+5:30
दहा लाखांचा मुद्देमाल जप्त : गुजरीत सराफाच्या दुकानावर टाकणार होते दरोडा
कोल्हापूर : गुजरी येथील सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्यासाठी जाणाऱ्या चौघाजणांच्या टोळीला जुना राजवाडा पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली. संशयित अरुण अंकुश गुंजाळ (वय २४) , रोहिदास देवराव गुंजाळ (२२, बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर), तानाजी भरत रिकोळी (३०, रा. गोटी, ता. करमाळा, जि. सोलापूर ), अर्जुन रामा रिकोळी (४२ रा. लवूळ, ता. माढा, जि. सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून स्कॉर्पिओ, लोखंडी कटावणी, कोयता, गज, नायलॉनची दोरी व मिरची पूड, चार मोबाईल असा सुमारे दहा लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली.
याबाबत पोलिसांनी सांगितले, जुना राजवाडा पोलीस शुक्रवारी मध्यरात्री गस्त घालत असताना ध्यानचंद हॉकी स्टेडियम परिसरात त्यांना संशयास्पद स्कॉर्पिओ थांबलेली आढळली. यावेळी गाडीजवळ जाऊन पाहिले असता आतमध्ये चौघेजण बसून होते. गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये दरोडा घालण्याचे साहित्य मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुजरी पेठ येथील सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्यासाठी जात असल्याचे सांगितले. ते कोणत्या सराफाच्या दुकानावर दरोडा टाकणार होते, त्यांना कोणी माहिती दिली होती, यासह अन्य कुठे दरोडे टाकले आहेत, याची चौकशी सुरू आहे. (प्रतिनिधी)