विकासाच्या आंधळ्या स्पर्धेत गंगा प्रदूषित
By Admin | Published: August 14, 2016 12:40 AM2016-08-14T00:40:17+5:302016-08-14T01:03:50+5:30
पन्यास राजरक्षित : श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टतर्फे अन्नछत्र
कोल्हापूर : स्वातंत्र्यानंतर देशात दुधा-तुपाच्या नद्या वाहतील, असे नेते सांगत होते; पण सध्याच्या स्थितीत कित्येक वर्षांनंतरही नद्या कोरड्याच दिसतात. उलट येथे रक्ताच्या नद्या वाहू लागल्या आहेत. विकासाच्या आंधळ्या स्पर्धेत पवित्र गंगा नदीही प्रदूषित झाली आहे, असे प्रतिपादन प्रवचनकर पन्यास श्री राजरक्षित विजयजी यांनी केले.
युगपुरुष आचार्यसम पन्यास प्रवर चंद्रशेखर विजयजी यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त गुजरीतील श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टतर्फे शनिवारी झालेल्या प्रवचनात राजरक्षित विजयजी बोलत होते.
गुरुपौर्णिमेला येथील संभवनाथ जैन मंदिर येथे प्रवचनकार पन्यास राजरक्षित विजयजी, मुनिश्री प्रियदर्शन विजयजी, मुनिश्री नयरक्षित विजयजी आणि बालमुनी तीर्थरक्षित विजयजी यांचे अगमन झाले आहे. चातुर्मासानिमित्त प्रवचनांच्या माध्यमातून तीन दिवस हा कार्यक्रम कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालेल.
प्रवचनात राजरक्षित विजयजी म्हणाले, भारत देशास ‘सोन्याचा देश’ म्हटले जात असे. पण, देशात करोडो लोकांना आज मूठभर अन्न मिळत नाही हे दुर्दैव आहे. सध्याची विकासाची स्पर्धा ही मृतदेहाला सजविण्यासारखी आहे. विकासाचा आलेख देशाच्या स्वतंत्र प्रजेला नष्ट, भ्रष्ट करीत आहे. स्वातंत्र्यानंतर हिंदुस्थानात दुधा-तुपाच्या नद्या वाहतील, असे नेते सांगत होते. उलट आज कित्येक वर्षांनंतरही याच नद्या कोरड्या दिसतात. विकासाच्या आंधळ्या स्पर्धेत पवित्र गंगाही प्रदूषित झाली आहे. मूठभर श्रीमंत लोक संपत्तीची उधळपट्टी करून गरिबांची क्रूर थट्टा करीत आहेत, भगवान श्री महावीर स्वामींनी विश्वातील सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करण्यास सांगितले आहे. प्रभू महावीर एका जातीचे नसून सर्व विश्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र ओसवाल, उपाध्यक्ष राजेश ओसवाल यांच्यासह सर्व विश्वस्त उपस्थित होते. (प्रतिनिधी)
ट्रस्टच्या वतीने चंबुखडी येथील मातोश्री वृद्धाश्रम, ‘अवनि’ अनाथाश्रम, बालसुधारगृहात फळे वाटप करण्यात आले. यासाठी श्री शांतीसुरी भक्तमंडळ आणि ओम शांती युवा संघटनांचे सहकार्य लाभले.