गंगाराम कांबळे पुण्यतिथी; स्मृतिस्तंभास अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:59 PM2020-02-26T12:59:13+5:302020-02-26T13:00:56+5:30
शाहूभक्त गंगाराम कांबळे यांच्या ६६ व्या पुण्यतिथीनिमित्त येथील टाऊन हॉल उद्यान परिसरातील गंगाराम कांबळे प्रतिष्ठानच्यावतीने ‘सत्यशोधक हॉटेल’ स्मृतिस्तंभास अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्याप्रसंगी माणिक पाटील-चुयेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी अॅड. अशोकराव साळोखे होते.
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केलेल्या अस्पृश्यता निवारण चळवळीची पहिली ठिणगी टाऊन हॉल उद्यान परिसरातील गंगाराम कांबळे यांच्या हॉटेल परिसरात पडली. त्याचा वणवा देशभर पसरला. त्यामुळेच हे सत्यशोधक हॉटेल अस्पृश्यता निवारण चळवळीचे पहिले प्रेरणास्थान आहे, असे प्रतिपादन माणिक पाटील-चुयेकर यांनी केले.
शाहूभक्त गंगाराम कांबळे यांच्या ६६ व्या पुण्यतिथीनिमित्त येथील टाऊन हॉल उद्यान परिसरातील गंगाराम कांबळे प्रतिष्ठानच्यावतीने ‘सत्यशोधक हॉटेल’ स्मृतिस्तंभास अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अॅड. अशोकराव साळोखे होते.
माणिक पाटील म्हणाले, सामाजिक समतेच्या हेतूने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी टाऊन हॉल परिसरात गंगाराम कांबळे यांना १९२६ साली ‘सत्यशोधक हॉटेल’ काढून दिले. आपल्या सहकाऱ्यांसमवेत ते या ठिकाणी स्वत: चहापान करायचे. या ऐतिहासिक ठिकाणी उभारलेल्या स्मृतिस्तंभाला भारताच्या इतिहासात मोलाचे स्थान आहे.
प्रारंभी माणिक पाटील-चुयेकर यांच्या हस्ते हॉटेल स्मृतिस्तंभास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी गंगाराम कांबळे यांचे नातू व शाहूभक्त गंगाराम कांबळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुण कांबळे, बाबा लिंग्रस, वसंत लिंगनूरकर, किशोर खानविलकर, सदानंद डिगे, अॅड. शेखर जाधव, प्रवीण कांबळे, आर. एन. जाधव, इशान जाधव, आदी उपस्थित होते.